भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४६६ :
न्यायालयीन अभिलेख किंवा सार्वजनिक नोंदपुस्तक, इ. चे बनावटीकरण :
(See section 337 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाने ठेवलेल्या न्यायालयीन अभिलेखाचे किंवा निबंधक जन्म, इत्यादी यांच्या अभिलेखाचे बनावटीकरण.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो दस्तऐवज म्हणजे न्यायालयाचा किंवा न्यायालयातील अभिलेख किंवा कार्यवाही असल्याचे, अथवा जन्म, बाप्तिस्मा, विवाह किंवा दफन यांचे नोंदपत्र असल्याचे, अथवा लोकसेवकाने त्या नात्याने ठेवलेले नोंदपुस्तक असल्याचे दिसते, अगर लोकसेवकाने त्याच्या पदाच्या नात्याने तयार केलेले प्रमाणपत्र किंवा दस्तऐवज असल्याचे, अथवा दावा मांडणे किंवा त्याच बचाव देणे, किंवा त्यातील कोणतीही कार्यवाही करणे किंवा न्यायनिर्णयास कबुली देणे याविषयीचे प्राधिकरपत्र असल्याचे अथवा एखादा मुखत्यारनामा असल्याचे दिसते त्या १.(दस्तऐवजाचे किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचे) जो कोणी बनावटीकरण करील त्याला, सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
१.(स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, नोंदपुस्तक यामध्ये कोणतीही यादी, आधारसामग्री किंवा माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० (२००० चा २१) याच्या कलम २ पोटकलम (१) च्या खंड (आर) मध्ये व्याख्या दिलेल्या इलेक्ट्रॉनिक स्वरुपात ठेवलेल्या कोणत्याही नोंदीचा अभिलेख यांचा समावेस होतो.)
——-
१. सन २००० चा अधिनियम क्र. २१ याचे कलम ९१ व अनुसूचीद्वारे मूळ मजकुराऐवजी १७-१०-२००० पासून घातला.
२. सन २००० चा अधिनियम क्र. २१ याचे कलम ९१ व अनुसूचीद्वारे समाविष्ट करण्यात आले.