Hma 1955 कलम १२ : शून्यकरणीय विवाह :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम १२ :
शून्यकरणीय विवाह :
१) कोणताही विवाह – मग तो अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो – पुढीलपैकी कोणत्याही कारणावरुन शून्यकरणीय असेल व शून्यतेच्या हुकूमनाम्याद्वारे तो रद्दबातल करता येईल, ती कारणे अशी :-
(a)१.(क) उत्तरवादीच्या मैथुनाक्षमतेमुळे विवाहाची परिपूर्ती झालेली नाही;) किंवा
(b)ख) त्या विवाहामुळे कलम ५ च्या खंड (दोन) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तीचे व्यतिक्रमण झाले आहे ; किंवा
(c)ग) विनंतीअर्जदाराची संमती, किंवा जेथे २.(बालविवाह निरोध (विशोधन) अधिनियम १९७८ याच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी कलम ५ जसे होते त्यानुसार) विनंतीअर्जदाराच्या विवाहार्थ पालकाची संमती आवश्यक होती तेथे, अशा पालकाची संमती बळजबरीने ३.(किंवा संस्कारांच्या स्वरुपाबाबत अथवा उत्तरवादीसंबंधीची कोणतीही महत्वाची वस्तुस्थिती वा परिस्थिती याबाबत लबाडी करुन) मिळविण्यात आली होती; किंवा
(d)घ) विवाहाच्या वेळी उत्तरवादी स्त्री ही विनंतीअर्जदाराहून अन्य व्यक्तीपासून गरोदर होती.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, विवाह रद्दबातल करण्यासाठी केलेला कोणताही विनंतीअर्ज –
(a)क) तो पोटकलम (१) च्या खंड (ग) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कारणावरुन केला असेल त्याबाबतीत, जर –
एक) बळजबरीचा प्रभाव थांबल्यानंतर किंवा, प्रकरणपरत्वे, लबाडी नजरेस आल्या नंतर एक वर्षाहून अधिक काळाने विनंतीअर्ज सादर करण्यात आला असेल तर; किंवा
दोन) बळजबरीचा प्रभाव थांबल्यानंतर किंवा, प्रकरणपरत्वे, लबाडी नजरेस आल्यानंतर, विनंतीअर्जदार त्याच्या किंवा तिच्या पूर्ण संमतीने विवाहतील दुसऱ्या पक्षाबरोबर पती किंवा पत्नी म्हणून राहिला / राहिली असेल तर,
विाचरार्थ स्वीकारला जाणार नाही.
(b)ख) तो पोटकलम (१) च्या खंड (घ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कारणावरुन केला असेल त्या बाबतीत, –
एक) विवाहाच्या वेळी विनंतीअर्जदार अभिकथित तथ्यांबाबत अनभिज्ञ होता;
दोन) या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी विधिपूर्वक लावलेल्या विवाहाच्या बाबतीत अशा प्रारंभापाूसन एका वर्षाच्या आत आणि अशा प्रारंभानंतर विधिपूर्वक लावलेल्या विवाहाच्या बाबतीत विवाहच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत कार्यवाही मांडण्यात आली आहे; आणि
तीन) ४.(उक्त कारण) अस्तित्वात असल्याचे विनंतीअर्जदाराच्या नजरेस आल्यापासून विनंतीअर्जदाराच्या संमतीने वैवाहिक संभोग घडून आलेला नाही,
अशी न्यायालयाची खात्री झाल्याखेरीज विचारार्थ स्वीकारला जाणार नाही.
———-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ६ द्वारे मूळ खंड (क) ऐवजी घातले.
२. १९७८ चा अधिनियम २ कलम ६ व अनुसूची यांद्वारे मूळ मजकुराऐवजी घातले.
३. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ६ द्वारे किंवा लबाडीने याऐवजी घातले.
४. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ६ द्वारे हुकूमनाम्यास आधारभूत अशी कारणे या मजकुराऐवजी घातले.

Leave a Reply