अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ४७ :
नमूना घेणे आणि विश्लेषण :
१) जेव्हा कोणताही अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी अन्नाचा (खाद्याचा) नमुना विश्लेषणासाठी घेईल तेव्हा तो,-
(a) क) ज्या व्यक्तीकडून त्याने अन्नाचा (खाद्याचा) नमुना घेतला आहे अशा व्यक्तीस व जिचे नाव, पत्ता व इतर विशिष्ट तपशील प्रकट केले असतील अशी कोणतीही व्यक्ती असल्यास तिला, त्याच्या हेतुबाबत लेखी सूचना देईल;
(b) ख) या अधिनियमान्वये बनवलेल्या नियमांद्वारे तरतुद केलेल्या विशेष प्रकरणांशिवाय, इतर बाबींत नमुन्याचे चार भाग करुन त्यावर खूण करुन व मोहोरबंद करील किंवा नमुन्याच्या स्वरुपानुसार प्रत्येक भाग अशा पद्धतीने घट्ट बांधील आणि त्या भागांवर ज्या व्यक्तींकडून अन्नाचा (खाद्याचा) नमुना घेतला आहे तिच्या सह्या किंवा अंगठ्याचा ठसा केन्द्र सरकारने विहित केलेल्या ठिकाणी व त्या पद्धतीने घेईल :
परंतु असे की, अशी व्यक्ती सही करण्यास किंवा अंगठ्याचा ठसा देण्यास नकार देत असेल तर, अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी एक किंवा अधिक साक्षीदारांस बोलावून अशा व्यक्तीऐवजी साक्षीदाराच्या सह्या किंवा अंगठ्याचा ठसा घेईल;
(c) ग) एक) निर्देशित अधिकाऱ्यास सूचित करुन नमुन्याचा एक भाग विश्लेषणाकरता अन्न (खाद्य) विश्लेषणाकडे पाठविल;
दोन) सुरक्षित ताब्यात ठेवण्यासाठी नमुन्याचे दोन भाग निर्देशित अधिकाऱ्याकडे पाठविल;
तीन) शेष (उरलेला) नमुन्याचा भाग निर्देशित अधिकाऱ्यास सूचित करुन, अन्न (खाद्य) व्यवसायिकाने तशी विनंती केली असेल तर, विश्लेषणासाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठविल :
परंतु असे की, उपखंड (एक) आणि उपखंड (तीन) अन्वये प्राप्त झालेल्या परीक्षण अहवालात तफावत आढळल्यास, निर्देशित अधिकारी त्याच्या ताब्यात असलेल्या नमुन्याचा एक भाग विश्लेषणाकरिता संदर्भ प्रयोगशाळेत पाठवील व या प्रयोगशाळेचा निर्णय अंतिम असेल.
२) अन्नाचा (खाद्याचा) किंवा भेसळीचा पदार्थाचा नमुना घेतल्यावर अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी, लगेच कार्याच्या दुसऱ्या दिवशी नमुन्याचा भाग विश्लेषणाकरिता त्या क्षेत्राकरिता नियुक्त केलेल्या अन्न (खाद्य) विश्लेषकाकडे पाठविल.
३) अन्न (खाद्य) विश्लेषकाकडे पाठविलेल्या नमुन्याचा भाग हरवला असेल किंवा त्याला हानी पोहोचला असेल तेथे निर्देशित अधिकारी अन्न (खाद्य) विश्लेषकाच्या किंवा अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याच्या मागणीवरुन त्याचेकडे पाठविलेल्या भागापैकी एक भाग विश्लेषणासाठी अन्न (खाद्य) विश्लेषकाकडे पाठवील.
४) जप्त केलेला कोणताही अन्न (खाद्य) पदार्थ किंवा भेसळीचा पदार्थ, नष्ट केला नसेल तर, शक्य तितक्या लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत अन्न (खाद्य) विश्लेषकाचा अहवाल मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत निर्देशित अधिकाऱ्यासमोर हजर केले जाईल :
परंतु असे की, ज्या व्यक्तीकडून अन्न (खाद्य) पदार्थ जप्त केला आहे त्या व्यक्तीने या बाबतीत निर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज केला असेल तर निर्देशित अधिकारी लिखित आदेशाद्वारे अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्यास तो अन्न (खाद्य) पदार्थ आदेशात विहित केलेल्या कालावधीत त्याचे समोर प्रस्तुत करण्यासाठी निर्देश देईल.
५) आयात केलेल्या अन्न (खाद्य) पदार्थाच्या बाबतीत, अन्न (खाद्य) प्राधिकरणाने प्राधिकृत केलेला अधिकारी नमुने घेइल आणि अधिसूचित प्रयोगशाळेच्या अन्न (खाद्य) विश्लेषकाकडे पाठविल जो पाच दिवसांच्या आत विश्लेषणाचा अहवाल प्राधिकृत अधिकाऱ्यास पाठविल.
६) निर्देशित अधिकारी, अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी, प्राधिकृत अधिकारी आणि अन्न (खाद्य) विश्लेषक विनियमांद्वारे यथाविनिर्दिष्ट केलेल्या प्रक्रियेचे पालन करतील.