Site icon Ajinkya Innovations

Fssai कलम ३६ : निर्देशित (नियुक्त) अधिकारी :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ३६ :
निर्देशित (नियुक्त) अधिकारी :
१) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त, आदेशाद्वारे, उपविभागीय अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्याची, विनियमांद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्रात अन्न (खाद्य) सुरक्षा प्रशासनाचा प्रभारी अधिकारी म्हणून निर्देशित (नियुक्त) अधिकाऱ्याची नियुक्ती करेल.
२) प्रत्येक जिल्ह्याकरिता निर्देशित (नियुक्त) अधिकारी असेल.
३) निर्देशित अधिकाऱ्याची कार्ये निम्नलिखित प्रमारे असतील, अर्थात :-
(a) क) अन्न (खाद्य) व्यावसायिकांना अनुज्ञप्ती (परवाना) देणे किंवा रद्द करणे;
(b) ख) या अधिनियमाच्या आणि त्याखाली बनविलेल्या विनियमांच्या आणि नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाच्या विक्रिवर प्रतिबंध घालणे;
(c) ग) त्याच्या अधिकार क्षेत्रातील अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्यांकडून अन्न (खाद्य) पदार्थाचे अहवाल आणि नमुने मिळविणे आणि त्यांचे विश्लेषण करणे;
(d) घ) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्तांना कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या प्रकरणांत खटले भरण्यास मंजुरी देण्याबाबत शिफारस करणे;
(e) ङ) द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेलेल्या प्रकरणात खटले भरण्यास मंजुरी देणे किंवा खटले भरणे;
(f) च) अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत तयार केलेल्या सर्व निरिक्षण अहवाल व त्यांनी त्यांच्या कर्तव्यानुसार केलेल्या कारवाईची नोंद सुस्थितीत ठेवणे;
(g) छ) या अधिनियमातील किंवा त्याखाली बनविलेल्या विनियम आणि नियमांच्या तरतुदींचे उल्लघंनाबाबत लेखी स्वरुपातील तक्रारीची चौकशी करणे;
(h) ज) अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याच्या विरोधात आलेल्या लेखी स्वरुपात आलेल्या तक्रारीची चौकशी करणे; आणि
(i) झ) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्तांनी नेमून दिलेली असतील अशी इतर अन्य कार्य पार पाडणे.

Exit mobile version