अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
प्रकरण ५ :
आयाती संबंधीच्या तरतुदी :
कलम २५ :
अन्न (खाद्य) पदार्थाची सर्व आयात या अधिनियमाच्या अधीन असणे :
१) कोणताही व्यक्ती भारतात,-
एक) कोणतेही असुरक्षित, मिथ्याछाप किंवा अप्रमाणित अन्न (खाद्य) पदार्थ किंवा ज्या अन्नात (खाद्यात) बाह्य पदार्थ असतील असे अन्न (खाद्य) आयात करणार नाही;
दोन) कोणतेही अन्न (खाद्य) पदार्थ आयात करण्याकरिता कोणताही अधिनियम किंवा नियम किंवा विनियमाद्वारे अनुज्ञप्तीची आवश्यकता असेल, अनुज्ञप्तिच्या अटींच्या अनुसारच्या शिवाय आयात करणार नाही;
तीन) या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेले कोणतेही नियम किंवा विनियम किंवा इतर कोणत्याही अधिनियमाच्या इतर कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करणारे कोणतेही अन्न (खाद्य) पदार्थ आयात करणार नाही;
२) केन्द्र सरकार, विदेश व्यापार (विकास आणि नियमन) अधिनियम १९९२ (१९९२ चा २२) ला अधीन राहून अन्न (खाद्य) पदार्थांचे आयातीवर प्रतिबंध, निर्बंध किंवा अन्यथा विनियमित करताना, या अधिनियमाच्या आणि याखाली केलेल्या नियम आणि विनियमाच्या तरतुदींना अधीन राहून अन्न (खाद्य) प्राधिकरण द्वारा घालून दिलेल्या मानकांचे पालन करतील.
