Epa act 1986 कलम ११ : नमुना घेण्याची शक्ती व त्या संबंधात अनुसरावयाची कार्यपद्धती :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम ११ :
नमुना घेण्याची शक्ती व त्या संबंधात अनुसरावयाची कार्यपद्धती :
(१) केंद्र सरकारला किंवा त्याने या बाबतीत शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला विहित करण्यात येईल अशा रीतीने विश्लेषणासाठी कोणत्याही कारखान्यातून, जागेतून किंवा इतर ठिकाणाहून तेथील हवेचे, पाण्याचे, मातीचे किंवा इतर पदार्थाचे नमुने घेण्याची शक्ती असेल.
(२) पोटकलम (१) अन्वये घेतलेल्या नमुन्याच्या विश्लेषणाचा निष्कर्ष हा, पोटकलमे (३) आणि (४) यांच्या उपबंधाचे अनुपालन करण्यास आल्याशिवाय, कोणत्याही वैध कार्यवाहीमध्ये पुरावा म्हणून ग्राह्य होणार नाही.
(३) पोटकलम (४) च्या उपबंधाच्या अधीनतेने पोटकलम (१) अन्वये नमुना घेणारी व्यक्ती –
(a) (क) त्याचे अशाप्रकारे विश्लेषण करवून घेण्याचा आपला हेतू असल्याबद्दल भोगवटादारावर किंवा त्याच्या अभिकत्र्यावर किंवा त्या जागेच्या प्रभारी व्यक्तीवर विहित करण्यात येईल अशा नमुन्यात, तेथल्या तेथे, एक नोटीस बजावील.
(b) (ख) भोगवटादाराच्या किंवा त्यांच्या अभिकत्र्याच्या किंवा व्यक्तीच्या समक्ष विश्लेषणाकरिता नमुना घेईल.
(c) (ग) नमुना एका वा अनेक पात्रांमध्ये ठेवला जाण्याची व्यवस्था करील व ती पात्रे चिन्हांकित करून मुद्रांकित करण्यात येतील आणि नमुना घेणारी व्यक्ती आणि भोगवटादार किंवा त्यांचा अभिकर्ता किंवा व्यक्ती हे दोघेही त्यावर सह्या करतील.
(d) (घ) ते पात्र किंवा पात्रे विलंब न लावता, कलम १२ अन्वये केंद्र सरकारने स्थापन केलेल्या किंवा मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेकडे पाठवील.
(४) जेव्हा पोटकलम (१) अन्वये, विश्लेषणासाठी नमुना घेण्यात आला असेल, आणि नमुना घेणाऱ्या व्यक्तीने भोगवटादारावर किंवा त्याच्या अभिकत्र्यावर किंवा व्यक्तीवर पोटकलम (३) च्या खंड (क) अन्वये नोटीस बजावली असेल, तेव्हा –
(a) (क) भोगवटादार किंवा त्याचा अभिकर्ता किंवा व्यक्ती जाणूनबुजून गैरहजर राहील अशा प्रकरणी, नमुना घेणारी व्यक्ती विश्लेषणाकरिता नमुना घेऊन तो एका वा अनेक पात्रात ठेवील आणि ती पात्रे चिन्हांकित आणि मुद्रांकित करण्यात येतील आणि नमुना घेणारी व्यक्ती त्यावर सहीदेखील करील, आणि
(b) (ख) भोगवटादार किंवा त्याचा अभिकर्ता किंवा व्यक्ती नमुना घेण्याच्या वेळेस हजर असेल; परंतु पोटकलम (३) च्या खंड (ग) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे नमुन्यात चिन्हांकित व मुद्रांकित पात्रांवर किंवा सही करण्यास त्याने नकार दिला असेल अशा प्रकरणी नमुना घेणारी व्यक्ती चिन्हांकित व मुद्रांकित पात्रावर किंवा पात्रांवर सही करील आणि नमुना घेणारा व्यक्ती विलंब न लावता ते पात्र किंवा पात्रे कलम १२ अन्वये स्थापन केलेल्या किंवा मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवील आणि अशी व्यक्ती कलम १३ अन्वये नियुक्त केलेल्या किंवा मान्यता दिलेल्या शासकीय विश्लेषकाला भोगवटादार किंवा त्याचा अभिकर्ता किंवा व्यक्ती जाणूनबुजून गैरहजर राहिल्याबद्दल किंवा प्रकरणपरत्वे, पात्रावर किंवा पात्रांवर सही करण्यास तिने नकार दिल्याबद्दल लेखी कळवील.

Leave a Reply