Cotpa कलम ९ : ज्या भाषेत वैधानिक इशारा दर्शविण्यात येईल ती भाषा :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम ९ :
ज्या भाषेत वैधानिक इशारा दर्शविण्यात येईल ती भाषा :
(१) जेव्हा सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यावर किंवा त्याच्या लेबलवर वापरलेली भाषा ही, –
(a)(क) इंग्रजी असेल तेव्हा, वैधानिक इशारा इंग्रजी भाषेत दर्शविण्यात येईल;
(b)(ख) कोणतीही भारतीय भाषा असतील तेव्हा, वैधानिक इशारा त्या भारतीय भाषेत किंवा भाषांमध्ये दर्शविण्यात येईल;
(c)(ग) इंग्रजी व एक किंवा त्यापेक्षा अधिक भारतीय भाषा अशा दोन्ही भाषा असतील तेव्हा वैधानिक इशारा हा इंग्रजी भाषेत, त्याचबरोबर, अशा भारतीय भाषेत किंवा भाषांमध्ये दर्शविण्यात येईल;
(d)(घ) अंशत: इंग्रजी आणि अंशत: कोणतीही भारतीय भाषा किंवा अनेक भाषा असतील तेव्हा, वैधानिक इशारा हा इंग्रजी भाषेत त्याचबरोबर अशा भारतीय भाषेत किंवा भाषांमध्ये दर्शविण्यात येईल;
(e)(ड) कोणतीही विदेशी भाषा असेल तेव्हा, वैधानिक इशारा हा, इंग्रजी भाषेत दर्शविण्यात येईल;
(f)(च) अंशत: कोणतीही विदेशी भाषा आणि अंशत: इंग्रजी किंवा कोणतीही भारतीय भाषा किंवा अनेक भाषा असतील तेव्हा, वैधानिक इशारा हा, इंग्रजी भाषेत त्याचबरोबर अशा भारतीय भाषेत किंवा भाषांमध्ये दर्शविण्यात येईल.
(२) सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यांवर किंवा त्याच्या लेबलवर वैधानिक इशाऱ्याशी विसंगत असेल किंवा त्याला कमी लेखणारा असेल अशा कोणत्याही मजकुराचा किंवा विधानाचा समावेश असणार नाही.

Leave a Reply