भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
(c) ग) (क) – उद्घोषणा व जप्ती :
कलम ८४ :
फरारी आरोपीबद्दल उद्घोषणा :
१) जर कोणत्याही न्यायालयाने ज्या व्यक्तीविरुध्द वॉरंट काढलेले असेल ती व्यक्ती अशा वॉरंटाची अंमलबजावणी करणे शक्य होऊ नये म्हणून फरारी झालेली आहे किंवा गुप्त राहिली आहे असे त्या न्यायालयाला सकारण वाटत असेल (मग ते पुरावा घेतल्यानंतर असो वा तसे नसो) तर, असे न्यायालय एक लेखी उद्घोषणा प्रकाशित करून, विनिर्दिष्ट स्थळी व अशी उद्घोषणा प्रकाशित केल्याच्या दिनांकापासून कमीत कमी तीस दिवसांच्या मुदतीनंतरच्या विनिर्दिष्ट वेळी त्या व्यक्तीला उपस्थित राहण्यास फर्मावू शकेल.
२) उद्घोषणा पुढीलप्रमाणे प्रकाशित केली जाईल :
एक) (a) क) (अ) अशी व्यक्ती सर्वसामान्यपणे जेथे राहात असेल त्या नगरातील किंवा गावातील एखाद्या ठळक जागी ती जाहीरपणे वाचून दाखवली जाईल;
(b) ख) (ब) अशी व्यक्ती सर्वसामान्यपणे जेथे राहत असेल त्या घराच्या किंवा घरवाडीच्या अथवा अशा नगरातील किंवा गावातील एखाद्या ठळक जागी ती लावली जाईल;
(c) ग) (क) तिची एक प्रत न्यायागृहाच्या एखाद्या ठळक भागी लावली जाईल;
दोन) अशी व्यक्ती सर्वसामान्यपणे जेथे राहत असेल त्या स्थळी प्रसृत होणाऱ्या एखाद्या दैनिक वृत्तपत्रात उद्घोषणेची एक प्रत प्रकाशित करणे न्यायालयाला योग्य वाटले तर ते तसाही निदेश देऊ शकेल.
३) पोटकलम (२) च्या खंड (एक) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने विनिर्दिष्ट दिवशी उद्घोषणा रीतसर प्रकाशित केली होती अशा आशयाचे, उद्घोषणा काढणाऱ्या न्यायालयाने केलेले लेखी निवेदन म्हणजे या कलमाव्दारे आवश्यक केलेल्या गोष्टींचे अनुपालन झालेले आहे व अशा दिवशी उद्घोषणा प्रकाशित केली होती याचा निर्णायक पुरावा असेल.
४) पोटकलम (१) अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली उद्घोषणा ही, भारतीय न्याय संहिता २०२३ किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्या खाली दहा वर्षे किंवा त्याहून अधिक किंवा आजीवन कारावास किंवा मृत्युदंडाच्या शिक्षायोग्य असलेल्या अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या संबंधात असेल आणि अशी व्यक्ती उद्घोषणेव्दारे फर्मावण्यात आले असेल अशा विनिर्दिष्ट ठिकाणी आणि वेळी उपस्थित राहण्यात कसूर करील तर, न्यायालयाला, त्याला योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर, उद्घोषित अपराधी म्हणून अधिघोषित करता येईल आणि तशा आशयाची घोषणा करता येईल.
५) पोटकलम (२) व (३) यांच्या तरतुदी पोटकलम (१) अन्वये करण्यात आलेल्या उद्घोषणेला जशा लागू होतात तशाच त्या पोटकलम (४) अन्वये न्यायालयाने केलेल्या घोषणेला लागू असतील.