भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ८१ :
अधिकारक्षेत्राबाहेरील पोलिसांना अंमलबजावणीसाठी दिलेले वॉरंट :
१) जेव्हा पोलीस अधिकाऱ्याला निदेशून लिहिलेल्या वॉरंटाची अंमलबजावणी, ते काढणाऱ्या न्यायालयाच्या स्थानिक अधिकारितेबाहेर करावयाची असेल तेव्हा, सर्वसामान्यापणे तो पोलीस अधिकारी ज्याच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादांच्या आत वॉरंटाची अंमलबजावणी करावयाची असेल त्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे किंवा त्या हद्दींमधील पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकऱ्याहून खालचा दर्जा नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडे ते वॉरंट पृष्ठांकनासाठी नेईल.
२) असा दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी त्यावर आपले नाव पृष्ठांकित करील व असे पृष्ठांकन म्हणजे वॉरंटाची अंमलबजावणी करण्यासाठी ते ज्याला निदेशून लिहिलेले आहे त्या पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला पुरेसा प्राधिकार असेल व स्थानिक पोलीस अशा वॉरंटाची अंमलबजावणी करण्याच्या कामी तशी मागणी करण्यात आल्यास अशा अधिकाऱ्याला साहाय्य करतील.
३) ज्याच्या स्थानिक अधिकारितेत वॉरंटाची अंमलबजावणी करावयाची असेल त्या दंडाधिकऱ्याचे किंवा पोलीस अधिकाऱ्याचे पृष्ठांकन मिळवत बसल्यास होणाऱ्या विलंबामुळे अशा अंमलबजावणीस आडकाठी होईल असे समजण्यास कारण असेल तेव्हा तेव्हा, ते ज्याला निदेशून लिहिलेले असेल तो पोलीस अधिकारी ज्याने ते वॉरंट काढले त्या न्यायालयाच्या स्थानिक अधिकारितेपलीकडील कोणत्याही स्थळी अशा पृष्ठांकनाशिवाय त्याची अंमलबजावणी करू शकेल.