भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ७० :
अशा प्रकरणांत जेव्हा समन्स बजावणारा अधिकारी उपस्थित नसेल, तेव्हा हद्दीबाहेरील समन्स बजावणीचा पुरावा :
१) जेव्हा न्यायालयाने काढलेले समन्स त्याच्या स्थानिक मर्यादांच्या बाहेर बजावण्यात आले असेल, आणि ज्याने समन्स बजावले असेल तो अधिकारी खटल्याच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित नसेल अशा कोणत्याही बाबतीत, असे समन्स बजावण्यात आले आहे असा आशयाचा व जो प्रतिज्ञालेख दंडाधिकाऱ्यापुढे केला असल्याचे दिसते तो प्रतिज्ञालेख आणि समन्सची प्रतिलिपी जिला सुपूर्द केली होती किंवा जिला देऊ केली होती किंवा जिच्याकडे ठेवली होती त्या व्यक्तीने (कलम ६४ किंवा कलम ६६ मध्ये उपबंधित केलेल्या रीतीने) पृष्ठांकित केल्याचे दिसून येणारी ती प्रतिलिपी ग्राह्य असेल, आणि विरूध्द काही शाबीत झाले नाही, तर व तापर्यंत, तीत केलेली निवेदने बरोबर असल्याचे मानले जाईल.
२) या कलमात उल्लेखिलेला प्रतिज्ञालेख समन्सच्या प्रतिलिपीला जोडून न्यायालयाकडे परत पाठवता येईल.
३) कलम ६४ ते ७१ (दोन्ही धरुन) अंतर्गत इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे दिलेले सर्व समन्स योग्यरित्या दिले गेले आहेत असे मानले जाईल आणि अशा इलेक्ट्रॉनिक समन्सची एक प्रत समन्सच्या सेवेचा पुरावा म्हणून प्रमाणित केली जाईल आणि तशीच ठेवली जाईल.