Bnss कलम ५२ : बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीची वैद्यक व्यवसायीकडून तपासणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५२ :
बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीची वैद्यक व्यवसायीकडून तपासणी :
१) एखाद्या व्यक्तीला बलात्कार केल्याच्या किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली असेल आणि त्याच्या शरीराची तपासणी केल्यास अपराधाचा पुरावा मिळेल असा विश्वास ठेवायला वाजवी कारण असेल तर, अशाबाबतीत, शासनाकडून किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयात सेवेत असलेल्या नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने आणि असा अधिकारी, अपराध करण्यात आलेल्या ठिकाणापासून सोळा किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळात असा व्यवसायी नसेल तर, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या विनंतीवर काम करणाऱ्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीचे आणि सद्हेतूने त्याला सहाय्य करणाऱ्या आणि त्याच्या तपासणी निदेशांनुसार काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अटक केलेल्या व्यक्तीची अशी तपासणी करणे आणि त्या प्रयोजनासाठी वाजवीरीत्या आवश्यक असेल अशा बलाचा वापर करणे कायदेशीर असेल.
२) अशी तपासणी करणारा नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी विनाविलंब अशा व्यक्तीची तपासणी करील आणि पुढील तपशील देणारा आपला अहवाल तयार करील :-
एक) आरोपी व्यक्तीचे आणि त्या व्यक्तीला जिच्याकडून आणले गेले त्या व्यक्तीचे नाव व पत्ता.
दोन) आरोपीचे वय.
तीन) आरोपीच्या शरीरावर जखमेच्या खुणा असल्यास त्या खुणा.
चार) डीएनए प्रोफायलिंगसाठी आरोपी व्यक्तीच्या शरीरावरून घेतलेल्या सामग्रीचे वर्णन.
पाच) इतर महत्वाची माहिती वाजवी तपशिलात.
३) अहवालात, काढण्यात आलेल्या निष्कर्षाची कारणे तपशीलवार नमूद करण्यात येतील.
४) तपासणी सुरू केल्याची आणि पूर्ण केल्याची अचूक वेळही अहवालात नमूद करण्यात येईल.
५) नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी तो अहवाल अन्वेषण अधिकाऱ्याकडे विनाविलंब पाठवील आणि तो अधिकारी तो अहवाल कलम १७३ मध्ये निर्दिष्ट केलेल्या दंडाधिकाऱ्याकडे, त्या कलमाच्या पोटकलम (६) च्या खंड (क) मध्ये उल्लेखिलेल्या दस्तऐवजांचा भाग म्हणून पाठवील.

Leave a Reply