भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५२५ :
न्यायाधीश किंवा दंडाधिकारी ज्यात व्यक्तिश: हितसंबंधित असेल तो खटला :
ज्या कोणत्याही खटल्यात कोणताही न्यायाधीश किंवा दंडाधिकारी स्वत: एक पक्षकार आहे किंवा तो व्यक्तिश: हितसंबंधित आहे त्यात, तो त्याच्या न्यायालयावर ज्या न्यायालयात अपील होऊ शकते त्याच्या परवानगीखेरीज त्या खटल्याची संपरीक्षा करणार नाही किंवा तो खटला संपरीक्षेसाठी सुपूर्द करणार नाही, आणि कोणताही न्यायाधीश किंवा दंडाधिकारी खुद्द त्याने दिलेल्या न्यायनिर्णयावरील किंवा आदेशावरील अपिलाची सुनावणी करणार नाही.
स्पष्टीकरण :
एखादा न्यायाधीश किंवा दंडादिकारी कोणत्याही खटल्याशी सार्वजनिक नात्याने संबंधित आहे एवढ्याच कारणाने, अथवा अपराध जेथे करण्यात आल्याचे अभिकथन करण्यात आलेले आहे ते स्थळ किंवा त्या खटल्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी अन्य कोणतीही घडामोड जेथे घडल्याचे अभिकथन करण्यात आलेले असेल असे अन्य कोणतेही स्थळ त्याने पाहिलले असून त्याने खटल्यासंबंधी चौकशी केलेली आहे एवढ्याच कारणाने तो त्यातील पक्षकार असल्याचे किंवा त्यात व्यक्तिश: हितसंबंधित असल्याचे मानले जाणार नाही.