Bnss कलम ५१ : पोलिसांच्या विनंतीवरून डॉक्टरने आरोपीची तपासणी करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५१ :
पोलिसांच्या विनंतीवरून डॉक्टरने आरोपीची तपासणी करणे :
१) एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक तपासणीवरून अपराध करण्यात आल्याचा पुरावा उपलब्ध होऊ शकेल असे समजण्यास वाजवी कारणे आहेत अशा स्वरूपाचा व अशा परिस्थितीत जो अपराध केलेला असल्याचे अभिकथन करण्यात आले असेल तो अपराध केल्याच्या दोषारोपावरून तिला अटक करण्यात आली असेल तेव्हा, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या विनंतीवरून कार्य करणाऱ्या नोंदीव वैद्यक व्ययसायीने आणि त्याला मदत म्हणून व त्याच्या निदेशाखाली सभ्दावपूर्वक कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, ज्या तथ्यांवरून असा पुरावा उपलब्ध होऊ शकेल त्यांची खात्री करून घेण्यासाठी वाजवी मर्यादेपर्यंत आवश्यक असेल अशी त्या अटक झालेल्या व्यक्तीची तपासणी करणे व त्या प्रयोजनासाठी वाजवी मर्यादेपर्यंत जरूर असेल इतक्या बळाचा वापर करणे कायदेशीर असेल.
२) जेव्हा केव्हा या कलमाखाली एखाद्या स्त्रीची शारीरिक तपासणी करावयाची असेल तेव्हा, ती तपासणी केवळ नोंदीव वैद्यक व्यवसायी स्त्रीकरवी किंवा तिच्या देखरेखीखालीच केली जाईल.
३) नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी तो तपासणी अहवाल अन्वेषण अधिकाऱ्याकडे विनाविलंब पाठवील.
स्पष्टीकरण :
या कलमात आणि कलमे ५२ व ५३ मध्ये –
(a) क) (अ) तपासणी यामध्ये रक्त, रक्ताचे डाग, वीर्य, लैंगिक अपराधांच्या बाबतीत कपडे, थुंकी व घाम, केसांचे नमुने व बोटांच्या नखांचे तुकडे यांची आधुनिक आणि शास्त्रीय तंत्राद्वारे तसेच, डीएनए प्रोफाइल द्वारे केलेली तपासणी यांचा आणि विशिष्ट प्रकरणात नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाला आवश्यक वाटेल अशा इतर चाचणी यांचा समावेश होतो;
(b) ख) (ब) नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी म्हणजे, जो राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अधिनियम २०१९ अन्वये मान्यताप्राप्त कोणतीही अर्हता धारण करतो आणि ज्याचे नाव राष्ट्रीय वैद्यकीय नोंदवहीत किंवा राज्य वैद्यकीय नोंदवहीत नोंदण्यात आले आहे असा वैद्यक व्यवसायी.

Leave a Reply