भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५११ :
चूक, गाळणूक, गैरनियम यामुळे निष्कर्ष किंवा शिक्षादेश केव्हा उलट फिरवता येईल :
१) यात यापूर्वी अंतर्भूत असलेल्या उपबंधांच्या अधीनतेने, सक्षम अधिकारितेच्या संपरीक्षेच्या पूर्वी किंवा दरम्यान फिर्यादीत, समन्सात, वॉरंटात, उद्घोषणेत, आदेशात, न्यायनिर्णयात किंवा अन्य कार्यवाहीत कोणतीही चूक, गाळणूक किंवा गैरनियम गोष्ट असल्यामुळे किंवा खटल्यास देण्यात आलेल्या मंजुरीत कोणतीही चूक किंवा गैरनियम गोष्ट असल्यामुळे अपिलाचे, कायमीकरणाचे किंवा पुनरीक्षणाचे जे न्यायालय असेल त्याच्याकडून फिरवला जाणार नाही किंवा त्यात फरबदल केला जाणार नाही. मात्र त्या न्यायालयाच्या मते त्यामुळे न्याय खरोखरीच निष्फळ झाला असेल तर तो अपवाद समजावा.
२) या संहितेखालील कोणत्याही कार्यवाहीत कोणत्याही चुकीमुळे, गाळणुकीमुळे किंवा गैरनियम गोष्टीमुळे अथवा खटल्यास देण्यात आलेल्या कोणत्याही चुकीमुळे किंवा गैरनियम गोष्टीमुळे न्याय निष्फळ झाला आहे का हे ठरवताना, कार्यवाही आधीच्या टप्प्यात असताना तो आक्षेप घेता आला असता काय व घ्यायला हवा होता काय हा मुद्दा न्यायालय लक्षात घेईल.