भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ३६ :
मालमत्तेची विल्हेवाट :
कलम ४९७ :
संपरीक्षा चालू असेपर्यंत मालमत्तेचा ताबा आणि विल्हेवाटीचा आदेश :
१) जेव्हा कोणत्याही चौकशीत किंवा संपरीक्षेत फौजदारी न्यायालयासमोर किंवा संपरीक्षा करण्यासाठी दखल घेण्याचा किंवा खटला चालविण्याचा अधिकार दिलेला दंडाधिकारी, कोणतीही मालमत्ता हजर केली जाईल तेव्हा, न्यायालय अन्वेषण, चौकशी किंवा संपरीक्षा समाप्त होईपर्यंत अशा मालमत्तेच्या योग्य अभिरक्षेसाठी त्याला योग्य वाटेल असा आदेश देऊ शकेल व जर मालमत्ता लवकर व स्वभावत: खराब होण्यासारखी असेल अगर तिची विक्री किंवा अन्य प्रकारे विल्हेवाट करणे समयोचित असेल तर, न्यायालय त्याला जरूर वाटेल असा पुरावा नोंदवल्यानंतर, तशी विक्री किंवा विल्हेवाट करण्याचा आदेश देऊ शकेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, मालमत्ता यात,-
(a) क) (अ) न्यायालयासमोर हजर केली असेल किंवा त्याच्या अभिरक्षेत असेल अशी कोणत्याही प्रकारची मालमत्ता किंवा दस्तऐवज,
(b) ख) (ब) जिच्या संबंधात अपराध करण्यात आल्याचे दिसत असेल किंवा जी कोणताही अपराध करण्यासाठी वापरण्यात आलेचे दिसत असेल अशी कोणतीही मालमत्ता, समाविष्ट आहे.
२) न्यायालय किंवा दंडाधिकारी, त्यांच्यासमोर पोटकलम (१) मध्ये नमूद केलेल्या मालमत्तेला प्रस्तुत केल्यापासून चौदा दिवसांच्या कालवधित, अशा मालमत्तेचा तपशील अशा स्वरुपात आणि अशा पद्धतीने, राज्य सरकार नियमांद्वारे उपबंधित करेल, तयार करील.
३) न्यायालय किंवा दंडाधिकारी पोटकलम (१) मध्ये नमूद केलेल्या मालमत्तेचे मोबाईल फोनद्वारे किंवा इतर कोणत्याही इलैक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे फोटो काढेल आणि आवश्यक असल्यास व्हिडियो बनविल.
४) पोटकलम (२) अंतर्गत तयार केलेले विवरण आणि पोटकलम (३) अंतर्गत घेतलेली छायाचित्रे किंवा व्हिडियो या संहितेच्या अतंर्गत कोणत्याही तपास, विचारण किंवा इतर कार्यवाही मध्ये पुरावा म्हणून वापरले जातील.
५) न्यायालय किंवा दंडाधिकारी, पोटकलम (२) अन्वये तयार केलेले विवरण आणि पोटकलम (३) अन्वये काढलेली छायाचित्रे किंवा व्हिडियो यांची विल्हेवाट, नाश, जप्ती किंवा अशा मालमत्तेची सुपूर्दगी, हि यापश्चात विहित आहे, अशा पद्धतीने करील.