Bnss कलम ४८ : अटक करणाऱ्या व्यक्तीचे अटक इत्यादीबाबत नामनिर्देशित व्यक्तीला कळविण्याचे दायित्व :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४८ :
अटक करणाऱ्या व्यक्तीचे अटक इत्यादीबाबत नामनिर्देशित व्यक्तीला कळविण्याचे दायित्व :
१) या संहितेअन्वये कोणतीही अटक करणारी प्रत्येक पोलीस अधिकारी किंवा इतर व्यक्ती अशा अटकेची किंवा अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला जेथे ठेवण्यात येत असेल त्या ठिकाणाविषयी, त्या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने अशा माहिती देण्याच्या प्रयोजनासाठी उघड केलेल्या किंवा नामनिर्देशित केलेल्या, त्या व्यक्तीच्या मित्रांना, नातेवाइकांना किंवा अशा इतर व्यक्तींना तसेच जिल्ह्यातील नियुक्त पोलीस अधिकाऱ्यालाही, तात्काळ कळवील.
२) पोलीस अधिकारी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यावर लगेच, त्या व्यक्तीला पोटकलम (१) अन्वये असलेल्या हक्कांची माहिती देईल.
३) अशा व्यक्तीच्या अटकेची माहिती कोणाला देण्यात आली आहे याबाबतची वस्तुस्थिती,राज्य शासनाकडून नियमांद्वारे याबाबतीत विहित करण्यात आले असेल अशा नमुन्यात पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत नोंदवण्यात येईल.
४) अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला ज्याच्या समोर सादर करण्यात आले असेल त्या दंडाधिकाऱ्याने, अशा अटक करण्यात आलेल्या व्यक्तीच्या संबंधातील पोटकलम (२)आणि पोटकलम (३) च्या गरजांचे पालन करण्यात आले आहे याबाबत स्वत:चे समाधान करून घेणे हे त्याचे कर्तव्य असेल.

Leave a Reply