भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४६७ :
अधीच दुसऱ्या एकाद्या अपराधाबद्दल शिक्षा झालेल्या अपराधीस शिक्षा देणे :
१) आधीच कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीला जेव्हा नंतरच्या दोषसिद्धीअंती कारावासाची किंवा आजीव कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येईल तेव्हा, नंतरची शिक्षा अशा आधीच्या शिक्षेस समवर्ती असेल असे न्यायालयाने निदेशित केले नाही तर एरव्ही, असा कारावास किंवा आजीव कारावास तिला आधी ज्या कारावासाची शिक्षा झाली होती तो कारावास संपताच सुरू होईल:
परंतु, जामीन देण्यात कसून केल्याबद्दल ज्या व्यक्तीला कलम १४१ खालील आदेशाद्वारे कारावासाची शिक्षा देण्यात आली असेल ती व्यक्ती अशी शिक्षा भोगत असताना असा आदेश दिला जाण्यापूर्वी केलेल्या अपराधाबद्दल तिला कारावासाची शिक्षा देण्यात येईल त्या बाबतीत, नंतरची शिक्षा तत्काळ सुरू होईल.
२) आधीच आजीव कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या एखाद्या व्यक्तीला नंतरच्या दोषसिद्धतीअंती काही मुदतीच्या कारावासाची किंवा आजीव कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येईल तेव्हा, नंतरची शिक्षा आधीच्या शिक्षेस समवर्ती असेल.