भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४४ :
अटकेस पात्र व्यक्तीने प्रवेश केलेल्या बंदिस्त स्थळाची झडती :
१) जर अटकेच्या वॉरंटान्वये कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा अटक करावयाचा प्राधिकार असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला, अटक करण्यात यावयाच्या व्यक्तीने एखाद्या स्थळी प्रवेश केलेला आहे किंवा ती तेथे आहे असे समजण्यास कारण असेल तर, अशा स्थळी राहणाऱ्या किंवा तेथील ताबा असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, पूर्वोक्तप्रमाणे कार्य करणाऱ्या अशा व्यक्तीकडून किंवा अशा पोलीस अधिकाऱ्याकडून मागणी झाल्यास त्यांना तेथे मुक्त प्रवेश दिला पाहिजे व तेथे झडती घेण्यासाठी सर्व वाजवी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
२) जर पोटकलम (१) खाली अशा स्थळी प्रवेश मिळू शकला नाही, तर वॉरंटान्वये कार्य करणाऱ्या व्यक्तीने व ज्या प्रकरणी वॉरंट निघू शकेल, पण ते मिळवायचे झाल्यास अटक करावयाच्या व्यक्तीला निसटण्याची संधी नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशा कोणत्याही प्रकरणी, पोलीस अधिकाऱ्याने अशा स्थळी प्रवेश करणे व तेथे झडती घेणे आणि आपल्या प्राधिकाराची व प्रयोजनाची सूचना देऊन, प्रवेश देण्याची रीतसर मागणी केल्यानंतर त्याला अन्यथा प्रवेश मिळू शकत नसेल, तर अशा स्थळी प्रवेश मिळवण्यासाठी कोणत्याही घराचे किंवा जागेचे – मग ते अटक करावयाच्या व्यक्तीचे असो वा अन्य कोणत्याही व्यक्तीचे असो – बाहेरील किंवा आतील दार किंवा खडकी फोडून उघडणे कायदेशीर असेल.
परंतु, रूढीनुसार जी परक्यांसमोर वावरत नाही अशा स्त्रीच्या ( ती अटक करावयाची व्यक्ती नसताना) प्रत्यक्ष ताब्यात असलेले असे दालन म्हणजे असे स्थळ असेल तर, अशी व्यक्ती किंवा पोलीस अधिकारी अशा दालनात प्रवेश करण्यापूर्वी अशा स्त्रीला निघून जाण्याची तिला मोकळीक आहे अशी सूचना देऊन, निघून जाण्यासाठी हर प्रकरची वाजवी सोय तिला उपलब्ध करून देईल, व नंतर तो दालन फोडून उघडू शकेल व त्यात प्रवेश करू शकेल.
३) अटक करण्यास प्राधिकृत असा कोणताही पोलीस अधिकारी किंवा अशी अन्य व्यक्ती, अटक करण्याच्या प्रयोजनार्थ कोणत्याही घरात किंवा जागेत कायदेशीरपणे प्रवेश करून तेथे अडकून पडल्यास स्वत:ची किंवा अशा अन्य कोणत्याही व्यक्तीची सुटका करण्यासाठी, त्याचे बाहेरील किंवा आतील दार किंवा खिडकी फोडून उघडू शकेल.