भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४३० :
अपील प्रलंबित असताना शिक्षादेशाचे निलंबन; अपीलकर्त्याची जामिनावर सुटका :
१) सिध्ददोष व्यक्तीने केलेले अपील प्रलंबित असताना कारणे लेखी नमूद करून त्यांकरता, अपील न्यायालय, ज्याविरूध्द अपील केलेले असेल त्या शिक्षादेशाची किंवा आदेशाची अंमलबजावणी निलंबित करावी असा व जर ती व्यक्ती बंदिवासात असेल तर, तिला जामिनावर किंवा तिच्या जातमुचलक्यावरून (बंधपत्र) किंवा जामीनपत्रावरुन सोडावे असाही आदेश देऊ शकेल :
परंतु असे की, ज्यासाठी मृत्यूची किंवा आजीवन कारावासाची किंवा दहा वर्षांपेक्षा ठरलेल्या व्यक्तीला जामिनावर किंवा त्याच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर (बंधपत्रावर) किंवा जामीनपत्रावर सोडऱ्यापूर्वी अपली न्यायालय, सरकारी अभियोक्त्याला अशा सोडण्याच्या विरोधातली कारणे लेखी देण्याची संधी देईल :
परंतु आणखी असे की, सिध्ददोष व्यक्तीला जामिनावर सोडण्यात आले असेल अशा बाबतीत, तो जामीन रद्द करण्यासाठीचा अर्ज सरकारी अभियोक्ता करू शकेल.
२) सिध्ददोष व्यक्तीने उच्च न्यायालयाला दुय्यम असलेल्या न्यायालयाकडे अपील केले असल्यास, या कलमाने अपील न्यायालयास प्रदान केलेला अधिकार उच्च न्यायालयासही त्या बाबतीत वापरता येईल.
३) अपील सादर करण्याचा आपला उद्देश आहे याबाबत सिध्ददोष व्यक्तीने, तिला ज्या न्यायालयाने सिध्ददोष ठरवले असेल त्याची खात्री पटवली तर,
एक) अशी व्यक्ती जामिनावर असून तिला जास्तीत जास्त तीन वर्षे इतक्या मुदतींच्या कारावासाचा शिक्षादेश मिळाला असेल त्या बाबतीत, किंवा
दोन) ज्या अपराधाबद्दल अशा व्यक्तीला सिध्ददोष ठरवण्यात आले तो, जामीनपात्र असून ती व्यक्ती जामिनावर असेल त्या बाबतीत,
अपील सादर केले जाण्यास व पोटकलम (१) खाली अपील न्यायालयाचे आदेश मिळण्यास पुरेसा वेळ मिळेल इतक्या कालावधीकरता ते न्यायालय जामीन नाकारण्यास विशेष कारणे नसल्यास, सिध्ददोष व्यक्तीला जामिनावर सोडण्याचा आदेश देईल; आणि ती व्यक्ती याप्रमाणे जामिनावर सुटलेली असेल तोपर्यंत कारावासाचा शिक्षादेश निलंबित असल्याचे मानण्यात येईल.
४) सरतेशेवटी अपीलकर्त्यांला काही मुदतच्या कारावासाचा किंवा आजीव कारावासाचा शिक्षादेश दिला जाईल तेव्हा, ज्या कालावधीत त्याला याप्रमाणे सोडलेले असेल ती कालावधी जितक्या मुदतीची शिक्षा त्याला दिलेली असेल तो कालावधी जितक्या मुदतीची शिक्षा त्याला दिलेली असेल तिची गणना करताना वगळण्यात येईल.