Bnss कलम ३९२ : न्यायनिर्णय :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण २९ :
न्यायनिर्णय :
कलम ३९२ :
न्यायनिर्णय :
१) मूळ अधिकारितेच्या कोणत्याही फौजदारी न्यायालयामधील प्रत्येक संपरीक्षेतील न्यायनिर्णय संपरीक्षा संपल्यानंतर ताबडतोब अथवा मागाहून पंचेचाळीस दिवसांनतर नाही एखाद्या वेळी (पक्षकारांना किंवा त्यांच्या वकिलांना त्याबाबत नोटीस दिली गेली पाहिजे) पीठासीन अधिकारी पुढीलप्रकारे खुल्या न्यायालयात अधिघोषित करील, ते असे –
(a) क) (अ)संपूर्ण न्यायनिर्णयपत्र देऊन; किंवा
(b) ख) संपूर्ण न्यायनिर्णय वाचून, किंवा
(c) ग) न्यायानिर्णयाचा प्रवर्ती भाग वाचून किंवा आरोपीला किंवा त्याच्या वकिलाला समजणाऱ्या भाषेत न्यायनिर्णयाचा सारांश समजावून देऊन.
२) जेथे पोटकलम (१) च्या खंड (a)(क) (अ)खाली न्यायनिर्णय दिला जाईल तेथे, पीठासीन अधिकारी त्याचे लघुलेखन करवून घेईल, अनुलिपी तयार झाल्याबरोबर तीवर आणि तिच्या प्रत्येक पृष्ठावर स्वाक्षरी करील आणि खुल्या न्यायालयात न्यायनिर्णय दिल्याचा दिनांक त्यावर लिहील.
३) पोटकलम (१) चा खंड किंवा प्रकरणपरत्वे, खंड (b)(ख) (ब) आणि खंड (c)(ग) (क)याखाली न्यायनिर्णय किंवा त्याचा प्रवर्ती भाग वाचून दाखविला जाईल. त्या बाबतीत, तो पीठासीन अधिकारी खुल्या न्यायालयात त्यावर दिनांक घालील आणि स्वाक्षरी करील आणि जर तो स्वहस्ताक्षरात लिहिलेला नसेल तर, न्यायनिर्णयाचा प्रत्येक पृष्ठावर तो स्वाक्षरी करील.
४) पोटकलम (१) चा खंड (c)(ग) (क) यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने न्यायनिर्णय अधिघोषित करण्यात येईल त्या बाबतीत, संपूर्ण न्यायनिर्णय किंवा त्याची प्रत पक्षकारांच्या किंवा त्यांच्या वकिलांच्या अवलोकनार्थ ताबडतोब विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल :
परंतु, न्यायालय, जोपर्यंत व्यवहार्य असेल तोपर्यंत, निकालाच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत निकालाची प्रत पोर्टलवर अपलोड करेल.
५) जर आरोपी हवालतीत असेल तर, अधिघोषित केलेला न्यायनिर्णय ऐकण्यासाठी त्याला वैयक्तिकरित्या तेथे किंवा दृकश्राव्य (ऑडियो व्हिडियो) माध्यमांद्वारे निकाल ऐकण्यासाठी, आणण्यात येईल.
६) जर आरोपी हवालतीत नसेल तर, संपरीक्षेच्या वेळी त्याची जातीनिशी हजेरी माफकरण्यात आली असून त्याला फक्त द्रव्यंदंडाचीच शिक्षा दिलेली असेल किंवा त्याला दोषमुक्त केलेले असेल ती बाब खेरीजकरून एरव्ही, न्यायलय त्यास न्यायनिर्णय ऐकण्यासही समक्ष हजर राहाणे आवश्यक करील :
परंतु, जेथे एकापेक्षा अधिक आरोपी असतील, आणि न्याय निर्णय अधिघोषित करावयाचा त्या दिनांकास त्यांच्यापैकी एक किंवा अधिक आरोपी न्यायालयात हजर राहिले नसतील त्या बाबतीत खटला निकालात काढण्यास गैरवाजवी विलंब लागू नये यासाठी पीठासीन अधिकारी ते गैरहजर असले तरीही न्यायनिर्णय अधिघोषित करू शकेल.
७) कोणत्याही फौजदारी न्यायालयाने दिलेला न्यायनिर्णय, तो देण्यासाठी कळवलेल्या दिवशी किंवा स्थळी एखादा पक्षकार किंवा त्याचा वकील अनुपस्थित राहिला अथवा अशा दिवसाबाबतची किंवा स्थळाबाबतची नोटीस अशा पक्षकारांवर किंवा त्यांच्या वकिलांवर किंवा त्यांच्यापैकी एखाद्यावर बजावण्यात आली नाही किंवा बजावणी सदोष होती एवढ्याच कारणाने विधिबाह्य असल्याचे मानले जाणार नाही.
८) या कलमातील कोणतीही गोष्ट कोणत्याही प्रकारे कलम ५११ च्या उपबंधांची व्याप्ती मर्यादित करते असा त्याचा अर्थ लावला जाणार नाही.

Leave a Reply