भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३८३ :
खोटा साक्षीपुरावा देणे:संक्षिप्त प्रक्रिया :
१) जर कोणताही न्याय निर्णय देतेवेळी किंवा कोणतीही न्यायिक कार्यवाही निकालात काढणारा कोणताही अंतिम आदेश देतेवेळी सत्र न्यायालायाने किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याने अशा आशयाचे मत व्यक्त केले की, अशा कार्यवाहीत उपस्थित झालेल्या एखाद्या साक्षीदाराने समजूनसवरून किंवा बुध्दिपुर:सर खोटा साक्षीपुरावा तयार केलेला आहे तर, खोटा साक्षीपुरावा दिल्याबद्दल किंवा, प्रकरणपरत्वे, तयार केल्याबद्दल त्या साक्षीदाराची संक्षिप्त संपरीक्षा करणे हे न्यायहितार्थ जरूरीचे व समयोचित आहे अशी स्वत:ची खात्री झाल्यास, ते न्यायालय किंवा दंडाधिकारी त्या अपराधाची दखल घेऊ शकेल आणि, अशा अपराधाबद्दल अपराध्याला शिक्षा का होऊ नये याचे कारण दाखवण्याची त्याला वाजवी संधी दिल्यानंतर अशा अपराध्याची संक्षिप्त संपरीक्षा करू शकेल आणि त्याला तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास, किंवा पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतका द्रव्यदंड, किंवा दोन्ही शिक्षा ठोठावू शकेल.
२) अशा प्रत्येक खटल्यात, न्यायालय संक्षिप्त संपरीक्षांसाठी विहित केलेल्या प्रक्रियेस शक्यतितकी जवळची प्रक्रिया अनुसरील.
३) न्यायालय या कलमाखाली कार्यवाही करण्याचा निर्णय घेत नाही त्या बाबतीत, त्या अपराधाबद्दल कलम ३७९ खाली फिर्याद देण्याच्या त्याच्या अधिकारावर या कलमातील कोणतीही गोष्ट परिणाम करणार नाही.
४) पोटकलम (१) खाली कोणतीही कारवाई सुरू केल्यानंतर जेव्हा त्या पोटकलमात निर्दिष्ट केलेले मत ज्या न्यायनिर्णयात किंवा आदेशात व्यक्त केलेले असेल त्याविरूध्द अपील किंवा पुनरीक्षण अर्ज सादर किंवा दाखल केलेला आहे असे त्या सत्र न्यायालयाला किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याला दाखवून देण्यात येईल तेव्हा, त्याला संपरीक्षेचे पुढील कामकाज, अपिलाचा किंवा, प्रकरणपरत्वे, पुनरीक्षण अर्जाचा निकाल होईपर्यंत तहकूब करता येईल,आणि तदनंतर पुढील कामकाज अपिलाच्या किंवा पुनरीक्षण अर्जाच्या निकालानुसार चालेल.