भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३६५ :
अंशत: एका दंडाधिकाऱ्याने व अंशत: दुसऱ्याने नोंदविलेल्या पुराव्यावरून दोषसिध्दी किंवा सुपूर्दगी :
१) जेव्हा केव्हा एखाद्या चौकशीत किंवा संपरीक्षेत संपूर्ण साक्षीपुरावा किंवा त्यांचा कोणताही भाग ऐकून तो नोंदवल्यानंतर एखादा न्यायाधीश किंवा दंडाधिकारी तीसंबंधीच्या अधिकारितेचा वापर करण्याचा थांबला असून, त्याच्या जागी दुसरा न्यायाधीश किंवा दंडाधिकारी आला असेल आणि त्याला अशी अधिकारिता असून ती तिचा वापर करत असेल तेव्हा, अशा अनुवर्ती न्यायाधीशाला किंवा दंडाधिकाऱ्याला आपल्या पूर्वधिकाऱ्याने याप्रमाणे नोंदवलेल्या साक्षीपुराव्यावरून अथवा अंशत: त्या पूर्वाधिकाऱ्याने व अंशत: आपण नोंदवलेल्या साक्षीपुराव्यावरून कार्यवाही करता येईल :
परंतु, ज्यांची साक्ष आधीच नोंदवण्यात आली आहे त्या साक्षीदारांपैकी कोणाचीही आणखी साक्षतपासणी होणे न्यायहितार्थ जरूरीचे आहे असे अनुवर्ती न्यायाधीशाचे किंवा दंडाधिकाऱ्याचे मत असेल तर, तो अशा कोणत्याही साक्षीदाराला पुन्हा समन्स काढू शकेल आणि तो ज्यासाठी परवानगी देईल अशी आणखी कोणतीही साक्षतपासणी, उलटतपासणी व फेरतपासणी झाल्यास त्यानंतर साक्षीदाराला जाऊ दिले जाईल.
२) जेव्हा या संहितेच्या उपबंधाखाली एखादा खटला एका न्यायाधीशाकडून दुसऱ्या न्यायाधीशाकडे किंवा एका दंडाधिकाऱ्याकडून दुसऱ्या दंडाधिकाऱ्याकडे वर्ग केला जाईल तेव्हा, पोटकलम (१) मध्ये अभिप्रेत असल्याप्रमाणे पहिल्या दंडाधिकाऱ्याचा त्यासंबंधीच्या अधिकारितेचा वापर थांबला असून दुसरा त्याचा उत्तराधिकारी झाला आहे असे मानले जाईल.
३) या कलमातील कोणतीही गोष्ट संक्षिप्त संपरीक्षांना अथवा ज्या खटल्यातील कार्यवाही कलम ३६१ खाली तहकूब करण्यात आला असेल किंवा ज्यातील कार्यवाही कलम ३६४ खाली वरिष्ठ दंडाधिकाऱ्याकडे सादर केली असेल त्या खटल्यांना लागू असणार नाही.