भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३६३ :
नाणी पाडणे, मुद्रांक कायदा किंवा संपत्ती यांच्या संबंधातील अपराधांबद्दल पूर्वी दोषसिद्धी झालेल्या व्यक्तींची संपरीक्षा :
१) जेथे एखाद्या व्यक्तीला भारतीय न्याय संहिता २०२३ प्रकरण १० वे किंवा प्रकरण १७ वे याखाली तीन वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल सिध्ददोष ठरवलेले असून, त्यांपैकी कोणत्याही प्रकरणाखाली तीन वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र अशा कोणत्याही अपराधाबद्दल तिच्यावर पुन्हा आरोप ठेवलेला असेल व अशा व्यक्तीने तो अपराध केलेला आहे असे गृहीत धरण्यास आधारकारण आहे अशी, ज्या दंडाधिकाऱ्यापुढे तो खटला प्रलंबित असेल त्याची खात्री होईल त्या बाबतीत, आरोपीला मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याकडे संपरीक्षेसाठी पाठवले जाईल किंवा सत्र न्यायालयाकडे सुपूर्द केले जाईल- मात्र प्रथमोक्त दंडाधिकारी त्या खटल्याची संपरीक्षा करण्यास सक्षम असेल व आरोपी सिध्ददोष ठरल्यास त्याला पुरेशी शिक्षा देणे आपणास शक्य आहे असे त्याचे मत असेल तर गोष्ट वेगळी.
२) जेव्हा कोणत्याही व्यक्तीला पोटकलम (१) खाली मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याकडे संपरीक्षेसाठी पाठविलेले असेल किंवा सत्र न्यायालयाकडे सुपूर्द केलेले असेल तेव्हा, त्याच चौकशीत किंवा संपरीक्षेत त्याच्याबरोबर संयुक्तपणे आरोप ठेवण्यात आलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीला दंडाधिकाऱ्याने कलम २६२ किंवा, प्रकरणपरत्वे, कलम २६८ खाली विनादोषारोप सोडले नाही तर एरव्ही, अशा अन्य व्यक्तीलाही त्याचप्रमाणे पाठवले किंवा सुपूर्द केले जाईल.