भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३५१ :
आरोपीची साक्षतपासणी करण्याचा अधिकार :
१) प्रत्येक चौकशीमध्ये किंवा संपरीक्षेमध्ये पुराव्यात आपल्याविरूध्द दिसणाऱ्या कोणत्याही परिस्थितिविशेषांचा व्यक्तिश: खुलासा करणे आरोपीला शक्य व्हावे यासाठी न्यायालय,-
(a) क) (अ) कोणत्याही टप्प्यात, न्यायालयाला जरूर वाटतील असे प्रश्न आरोपीला पूर्वसूचना दिल्याशिवाय विचारू शकेल;
(b) ख) (ब) फिर्यादीपक्षाच्या साक्षीदारांची साक्षतपासणी केल्यानंतर व आरोपीला आपला बचाव देण्यास सांगण्यापूर्वी त्या प्रकरणाबाबत सर्वसाधारण स्वरूपाचे प्रश्न विचारील: परंतु, ज्या समन्स खटल्यात न्यायालयाने आरोपीला जातीनिशी हजर राहण्यापासून माफी दिली असेल त्यामध्ये, ते खंड (ब)खाली त्याची साक्षतपासणी करण्यापासूनसुध्दा माफी देऊ शकेल.
२) पोटकलम (१)खाली आरोपीची साक्षतपासणी होईल तेव्हा, त्याला शपथ दिली जाणार नाही.
३) अशा प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार देण्यामुळे किंवा त्यांना खोटी उत्तरे देण्यामुळे आरोपी स्वत:शिक्षेस पात्र होणार नाही.
४) आरोपीने दिलेली उत्तरे अशा चौकशीत किंवा संपरीक्षेत विचारात घेता येतील व त्याने जो कोणताही अपराध केला असल्याचे अशा उत्तरांवरून सूचित होऊ शकेल अशा अन्य कोणत्याही अपराधाबद्दलच्या अन्य कोणत्याही चौकशीत किंवा संपरीक्षेत त्याच्या बाजूने किंवा त्याच्याविरूध्द पुराव्यादाखल मांडता येतील.
५) न्यायालय, आरोपी व्यक्तीस जे प्रश्न विचारावयाचे आहेत असे संबंधित प्रश्न तयार करताना, अभियोक्त्याची व बचावपक्षाच्या समुपदेशीची मदत घेऊ शकेल आणि न्यायलय, या कलमाचे पर्याप्तपणे पालन केले असल्याबाबत आरोपी व्यक्तीस लेखी निवेदन सादर करण्यास परवानगी देऊ शकेल.