Bnss कलम ३४२ : महामंडळ किंवा नोंदिव सोसायटी आरोपी असेल तेव्हा प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३४२ :
महामंडळ किंवा नोंदिव सोसायटी आरोपी असेल तेव्हा प्रक्रिया :
१) या कलमात निगम याचा अर्थ, निगमित कंपनी किंवा अन्य निगम-निकाय असा आहे आणि त्यात सोसायटी नोंदणी अधिनियम, १८६० (१८६० चा २१ ) याखाली नोंदलेल्या सोसायटीचा समावेश आहे.
२) जेव्हा एखाद्या चौकशीत किंवा संपरीक्षेत निगम हा आरोपी व्यक्ती किंवा आरोपी व्यक्तीपैकी एक असेल, तेव्हा त्याला चौकशीच्या किंवा संपरीक्षेच्या प्रयोजनार्थ प्रतिनिधी नियुक्त करता येईल आणि अशी नियुक्ती ही निगमाच्या मोहोरेनिशी केली जाण्याची गरज नाही.
३) निगमाच्या प्रतिनिधी उपस्थित राहील त्या बाबतीत, एखादी गोष्ट समक्ष केली पाहिजे किंवा आरोपीला वाचून दाखवली किंवा सांगितली पाहिजे किंवा समजावून दिली पाहिजे असा या संहितेतील कोणताही दंडक म्हणजे ती गोष्ट त्या प्रतिनिधीच्या समक्ष केली पाहिजे किंवा प्रतिनिधीला वाचून दाखवली पाहिजे किंवा सांगितली पाहिजे किंवा समजावून दिली पाहिजे असा दंडक होय असा त्याचा अर्थ लावला जाईल आणि आरोपीची साक्षतपासणी केली पाहिजे असा कोणताही दंडक म्हणजे प्रतिनिधीची साक्षतपासणी केली पाहिजे असा दंडक होय असा त्याचा अर्थ लावला जाईल.
४) निगमाचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही त्या बाबतीत, पोटकलम (३)मध्ये निर्देशिलेला असा कोणताही दंडक लागू असणार नाही.
५) निगमाच्या व्यवस्थापकीय संचालकाने अथवा त्याच्याद्वारे रितसर अधिकृत केलेल्या निगमाच्या कारभाराचे व्यवस्थापन करणाऱ्या किंवा करणाऱ्यांपैकी एक असलेल्या व्यक्तीने (मग तिला कोणत्याही नावाने संबोधण्यात येवो)स्वाक्षरित केले असल्याचे दिसणारे जे निवेदन, त्यात नामनिर्दिष्ट केलेली व्यक्ती या कलमाच्या प्रयोजनार्थ निगमाचा प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे अशा आशयाचे असून ते दाखल करण्यात आले असेल त्या बाबतीत, विरूध्द शाबीत झाले नाही तर, अशी व्यक्ती याप्रमाणे नियुक्त झाली आहे असे न्यायालय गृहीत धरील.
६) न्यायालयापुढील चौकशीत किंवा संपरीक्षेत निगमाचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणारी कोणतीही व्यक्ती ही असा प्रतिनिधी आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाला तर, न्यायाधीश त्या प्रश्नाचा निर्णय करील.

Leave a Reply