भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३३९ :
खटला चालविण्यास परवानगी :
१) एखाद्या खटल्याची चौकशी किंवा संपरीक्षा करणारा कोणताही दंडाधिकारी निरीक्षकाहून खालच्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याहून अन्य कोणत्याही व्यक्तीला खटला चालविण्यास परवानगी देऊ शकेल, पण महा अधिवक्ता किंवा सरकारी अधिवक्ता किंवा सरकारी अभियोक्ता किंवा सहाय्यक सरकारी अभियोक्ता याहून अन्य कोणतीही व्यक्ती, अशा परवानगीशिवाय तसे करण्यास हक्कदार असणार नाही :
परंतु, ज्या अपराधाबाबत आरोपीविरूध्द खटला चालवण्यात आला असेल त्याच्या चौकशीत कोणत्याही पोलिसाने भाग घेतला नसल्यास त्याला खटला चालविण्याची परवानगी दिली जाणार नाही.
२) खटला चालवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तो जातीनिशी किंवा वकिलाकरवी चालविता येईल.