Bnss कलम ३३५ : आरोपीच्या अनुपस्थितीत पुराव्याचा अभिलेख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३३५ :
आरोपीच्या अनुपस्थितीत पुराव्याचा अभिलेख :
१) जर आरोपी व्यक्ती फरारी झाली आहे, आणि त्या व्यक्तीला तत्काळ अटक करता येईलसे दिसत नाही असे शाबीत करण्यात आले तर, ज्या अपराधाबद्दल फिर्याद देण्यात आली त्याबद्दल अशा व्यक्तीची संपरीक्षा करण्यास किंवा संपरीक्षा होईपावेतो तिला हवालतीत ठेवण्यास सक्षम असलेले न्यायालय तिच्या अनुपस्थितीत फिर्यादी पक्षाच्या वतीने कोणी साक्षीदार हजर केलेले असल्यास त्यांची साक्षतपासणी करू शकेल आणि त्यांच्या जबान्या नोंदवू शकेल आणि अशा व्यक्तीला अटक करण्यात आल्यावर, ज्या अपराधाचा दोषारोप तिच्यावर ठेवलेला असेल त्याबाबतच्या चौकशीच्या किंवा त्याबद्दलच्या संपरीक्षेच्या वेळी जबानीदार मृत्यू पावला असल्यास, किंवा साक्ष देण्यास असमर्थ असल्यास, किंवा सापडू शकत नसल्यास किंवा त्याला हजर करावयाचे झाल्यास, त्या खटल्याच्या परिस्थितीत गैरवाजवी ठरेल इतका विलंब, खर्च किंवा गैरसोय झाल्याशिवाय राहणार नाही असे असल्यास, अशी कोणतीही जबानी आरोपीविरूध्द पुराव्यात देता येईल.
२) जर मृत्यूच्या किंवा आजीव कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध एखाद्या अज्ञान व्यक्तीने किंवा व्यक्तींनी केला आहे असे दिसून आले तर, उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायाधीश असे निर्देशित करू शकेल की, कोणत्याही प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याने रीतसर चौकशी करावी आणि अपराधासंबंधी साक्षीपुरावा देऊ शकणाऱ्या कोणत्याही साक्षीदाराची तपासणी करावी आणि मागाहून कोणत्याही व्यक्तीवर त्या अपराधाचा आरोप ठेवला जाईल तेव्हा याप्रमाणे घेतलेल्या जबान्या, जबानीदार मृत्यू पावला असल्यास, किंवा साक्ष देण्यास असमर्थ असल्यास किंवा तो भारताच्या सीमांबाहेर असल्यास, आरोपीविरूध्द पुराव्यात देता येतील.

Leave a Reply