भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३१६ :
आरोपीच्या साक्षतपासणीचा अभिलेख :
१) जेव्हा केव्हा आरोपीची साक्ष तपासणी महानगर दंडाधिकाऱ्याहून अन्य कोणताही दंडाधिकारी किंवा सत्र न्यायालय यांच्याकडून केली जाईल तेव्हा, आरोपीला विचारलेला प्रत्येक प्रश्न व त्याने दिलेले प्रत्येक उत्तर धरून अशी संपूर्ण साक्ष तपासणी पीठासीन न्यायाधीश किंवा दंडाधिकारी स्वत: अथवा शारीरिक किंवा अन्य प्रकारच्या अक्षमतेमुळे तो तसे करण्यास असमर्थ असेल तर, त्यांच्या निदेशानुसार व देखरेखीखाली त्याने या संबंधात नियुक्त केलेला अधिकारी पूर्णतया नोंदवून घेईल.
२) जमल्यास तो अभिलेख आरोपीची साक्षतपासणी ज्या भाषेत झाली असेल त्या भाषेत किंवा ते जमण्यासारखे नसेल तर, न्यायालयाच्या भाषेत केला जाईल.
३) अभिलेख आरोपीला दाखविला जाईल किंवा वाचून दाखविला जाईल, अथवा, तो ज्या भाषेत लिहिलेला आहे ती भाषा त्याला समजत नसेल तर, त्याला समजणाऱ्या भाषेत भाषांतर करून तो त्याला सांगितला जाईल आणि आपली उत्तरे स्पष्ट करण्याची किंवा त्यात भर घालण्याची त्याला मोकळीक असेल.
४) त्यानंतर आरोपी त्यावर स्वाक्षरी करील आणि दंडधिकारी किंवा पीठासीन न्यायाधीशही त्यावर स्वाक्षरी करील आणि आपल्या समक्ष व आपल्याला ऐकू येईल अशा रीतीने साक्षतपासणी घेतलेली होती व आरोपीने दिलेल्या जबाबाचा संपूर्ण व खरा वृत्तांत अभिलेखात अंतर्भूत आहे असे स्वाक्षरीनिशी प्रमाणित करील :
परंतु असे की, आरोपी जेथे कोठडीत असे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे त्याची तपासणी होत असेल, अशा तपासणीच्या बहात्तर तासांच्या आत त्याची स्वाक्षरी घेण्यात येईल.
५) संक्षिप्त संपरीक्षेच्या ओघात होणाऱ्या आरोपी व्यक्तीच्या साक्षतपासणीस या कलमातील कोणतीही गोष्ट लागू होत नाही.