भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३०८ :
साक्षीपुरावा आरोपीच्या समक्ष घ्यावयाचा :
अन्यथा स्पष्टपणे उपबंधित केले असेल ते खेराजकरून एरव्ही संपरीक्षेच्या किंवा अन्य कार्यवाहीच्या ओघात घेतला जाणारा सर्व साक्षीपुरावा आरोपीच्या समक्ष, किंवा त्याची जातीनिशी उपस्थिती माफ केलेली असेल तेव्हा त्याच्या वकिलाच्या समक्ष घेण्यात येईल यामध्ये राज्य सरकार द्वारा अधिसूचित केले जाणारे अभिहित ठिकाणावर श्रव्य – दृश्य (ऑडियो व्हिडियो) इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे घेतली जाणारी साक्ष याचा समावेश आहे :
परंतु असे की, जेव्हा अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या, जिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे किंवा जिच्याबाबतीत लैंगिक अपराध करण्यात आला आहे असे कथित असेल अशा स्त्रीची साक्ष लेखनिविष्ट करावयाची असेल तेव्हा, न्यायालयाला अशा स्त्रीच्या समोर आरोपी व्यक्ती नसेल हे सुनिश्चित करण्यासाठी उपाय योजता येतील, त्याचबरोबर आरोपीचा उलटतपासणीचा हक्क सुध्दा सुनिश्चित करण्यात येईल.
स्पष्टीकरण :
या कलमात आरोपी या संज्ञेमध्ये, या संहितेखाली ज्या व्यक्तीच्या संबंधात ९ व्या प्रकरणाखाली कोणतीही कार्यवाही सुरु करण्यात आली असेल त्या व्यक्तिचा समावेश आहे.