भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २६९ :
आरोपीला जेव्हा विनादोषारोप सोडले जात नाही तेव्हाची प्रक्रिया :
१) असा साक्षीपुरावा घेण्यात आलेला असेल किंवा खटला कोणत्याही पुर्वीच्या टप्प्यात असताना, या प्रकरणाखाली संपरीक्षा करण्याजोगा अपराध आरोपीने केलेला आहे हे गृहीत धरण्यासाठी आधार आहे असे दंडाधिकाऱ्याचे मत झाले आणि असा दंडाधिकारी त्या अपराधाची संपरीक्षा करण्यास सक्षम असून, त्याच्या मते तो त्या अपराधाबद्दल पर्याप्त शिक्षा देऊ शकत असेल तर, तो आरोपीविरूध्द दोषारोपाची लेखी मांडणी करील.
२) नंतर आरोपीला दोषारोप वाचून दाखवण्यात येईल व समजावून सांगण्यात येईल, आणि त्याला आपण अपराधी असल्याची कबुली द्यावयाची आहे की काही बचाव द्यावयाचा आहे हे विचारले जाईल.
३) जर आरोपीने आपण अपराधी असल्याची कबुली दिली तर, दंडाधिकारी ती कबुली नोंदून घेईल आणि स्वविवेकानुसार तीवरून त्याला सिध्ददोष ठरवू शकेल.
४) जर आरोपीने उत्तर देण्यास नकार दिला तर, किंवा उत्तर दिले नाही तर, किंवा संपरीक्षा करण्याची मागणी केली तर, किंवा पोटकलम (३) खाली आरोपीला सिध्ददोष ठरविण्यात आले नाही तर, फिर्यादीपक्षाच्या ज्या साक्षीदारांची साक्ष तपासणी करण्यात आली असेल त्यांपैकी एखाद्याची उलटतपासणी करण्याची आपली इच्छा आहे काय, व असल्यास, कोणाची उलटतपासणी करावयाची आहे ते आरोपीने खटल्याच्या पुढील सुनावणीच्या प्रारंभी किंवा दंडाधिकाऱ्याला काही कारणांस्तव – ती कारणे नमूद करावी लागतील- तसे योग्य वाटल्यास तत्काळ निवेदन करावे, असे आरोपीला सांगितले जाईल.
५) आपली तशी इच्छा आहे असे त्याने सांगितले तर, त्याने नावे सांगितलेल्या साक्षीदारांना पुन्हा बोलावले जाईल, आणि उलटतपासणी व (झाल्यास ) फफेरतपासणी झाल्यानंतर त्यांना मोकळे करण्यात येईल.
६) फिर्यादी पक्षाच्या बाकीच्या कोणत्याही साक्षीदारांची साक्ष त्यानंतर घेण्यात येईल, आणि उलटतपासणी व (झाल्यास )फफेरतपासणी झाल्यानंतर, त्यांनादेखील मोकळे करण्यात येईल.
७) जेथे, या संहितेखाली फिर्यादीला संधी दिली असूनही आणि सर्व वाजवी उपाययोजना केल्यानंतर, पोटकलम (५) आणि पोटकलम (६) खाली उलटतपासणी फिर्यादी साक्षीदारांची उपस्थिती सुनिश्चित करता येत नाही, तेव्हा असे मानले जाईल की असा साक्षीदार तपासणीसाठी उपलब्ध नाही, आणि दंडाधिकारी लिखित स्वरुपात नोंदवण्याच्या कारणास्तव फिर्यदी पुरावे बंद करु शकतात आणि रेकॉर्डवरील सामग्रीच्या आधारावर खटला पुढे चालू ठेवू शकतात.