Bnss कलम २६५ : फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २६५ :
फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा :
१) जर आरोपीने उत्तर देण्यास नकार दिला तर, किंवा उत्तर दिले नाही किंवा संपरीक्षा करण्याची मागणी केली तर, किंवा दंडाधिकाऱ्याने कलम २६४ खाली आरोपीस सिध्ददोष ठरवले नाही तर, दंडाधिकारी साक्षीदारांच्या साक्षतपासणीसाठी तारीख निश्चित करील :
परंतु, दंडाधिकारी, आरोपी व्यक्तीस, पोलिसांनी अन्वेषण करताना नोंदविलेले साक्षीदारांचे जाबजबाब आगाऊ पुरवील.
२) फिर्यादीपक्षाच्या अर्जावरून, दंडाधिकारी त्या पक्षाच्या कोणत्याही साक्षीदारास समक्ष हजर होण्याचा अथवा कोणताही कागद किंवा अन्य व तू हजर करण्याचा निदेश देणारे समन्स त्याच्यावर काढू शकेल.
३) याप्रमाणे निश्चित केलेल्या तारखेस दंडाधिकारी फिर्यादी पक्षाच्या पुष्टयर्थ हजर केला जाईल असा सर्व साक्षीपुरावा घेण्याचे काम सुरू करील :
परंतु, दंडाधिकारी एखाद्या साक्षीदारांची उलटतपासणी अन्य कोणत्याही साक्षीदाराची किंवा साक्षीदारांचा तपासणी होईपर्यंत लांबणीवर टाकण्यास परवानगी देऊ शकेल किंवा कोणत्याही साक्षीदारास आणखी उलटतपासणीसाठी पुन्हा बोलावू शकेल :
परंतु आणखी असे की, या कलमाखाली साक्षीदाराची परीक्षा, राज्य सरकार द्वारा अधिसूचित केलेल्या नियुक्त ठिकाणी श्रव्य-दृश्य (ऑडियो – व्हिडियो) इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे केली जाऊ शकेल.

Leave a Reply