भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २५९ :
पूर्वीची दोषसिध्दी :
पूर्वी दोषसिध्दी झाली असल्याबद्दल कलम २३४ चे पोटकलम (७) याच्या उपबंधांखाली दोषारोप ठेवण्यात आला असेल आणि दोषारोपात अभिकथन केल्याप्रमाणे आपणांस पूर्वी सिध्ददोष ठरवण्यात आले असल्याचे तो कबूल करत नसेल अशा प्रकरणी, कलम २५२ किंवा कलम २५८ खाली उक्त आरोपीस सिध्ददोष ठरवल्यानंतर न्यायाधीशाला अभिकथित पूर्व दोषसिध्दीबाबत साक्षीपुरावा घेता येईल, आणि त्यावरील निष्कर्ष त्याला नमूद करावा लागेल.
परंतु, कलम २५२ किंवा कलम २५८ खाली आरोपीला सिध्ददोष ठरवण्यात आल्याशिवाय, न्यायाधीश असा कोणताही दोषारोप वाचून दाखविणार नाही किंवा आरोपीला त्याबाबत उत्तर देण्यास सांगितले जाणार नाही, अथवा फिर्यादीपक्षाला किंवा त्याने दाखल केलेल्या साक्षीपुराव्यात पूर्वीच्या दोषसिध्दीचा निर्देश करता येणार नाही.