भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २१२ :
दंडाधिकाऱ्याकडे प्रकरण सोपविणे :
१) अपराधाची दखल घेतल्यानंतर कोणत्याही मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याला ते प्रकरण आपणांस दुय्यम असणाऱ्या सक्षम दंडाधिकाऱ्याकडे चौकशीसाठी किंवा संपरीक्षेसाठी सोपवता येईल.
२) मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याने या संबंधात अधिकार प्रदान केलेल्या कोणत्याही प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याला, अपराधाची दखल घेतल्यानंतर ते प्रकरण मुख्य न्याय दंडाधिकारी सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अन्य सक्षम दंडाधिकाऱ्याकडे चौकशीसाठी किंवा संपरीक्षेसाठी सोपवता येईल आणि तदनंतर अशा दंडाधिकाऱ्याला चौकशी किंवा संपरीक्षा करता येईल.