Bnss कलम १९६ : मृत्यूच्या कारणाची दंडाधिकाऱ्याने चौकशी करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १९६ :
मृत्यूच्या कारणाची दंडाधिकाऱ्याने चौकशी करणे :
१) जेव्हा एखादे प्रकरण कलम १९४ पोटकलम (३) चा खंड (एक) किंवा खंड (दोन) यामध्ये निर्देशिलेल्या स्वरूपाचे असले तेव्हा, मरन्वेषण करण्याचा अधिकार प्रदान झालेल्या सर्वांत जवळच्या दंडाधिकाऱ्याला कलम १९४ च्या पोटकलम (१) मध्ये उल्लेखिलेल्या अन्य कोणत्याही प्रकरणी, याप्रमाणे अधिकार प्रदान झालेल्या कोणत्याही दंडाधिकाऱ्याला पोलीस अधिकाऱ्याने करावयाच्या अन्वेषणाच्या ऐवजी किंवा त्याशिवाय आणखी, मृत्यूच्या कारणबाबत चौकशी करता येईल; व जर त्याने तसे केले तर, त्याला एखाद्या अपराधाची रीतसर चौकशी करताना जे अधिकार राहिले असते ते सर्व अधिकार ती चौकशी चालवताना राहतील.
२) जेव्हा
(a) क) (अ) एखादी व्यक्ती मरण पावली असेल, किंवा बेपत्ता झाली असेल, किंवा
(b) ख) (ब) एखाद्या महिलेवर बलात्कार करण्यात आला असेल तेव्हा,
अशी व्यक्ती किंवा महिला पोलीस कोठडीत किंवा दंडाधिकाऱ्याने किंवा न्यायालयाने या संहितेअन्वये प्राधिकृत केलेल्या इतर कोणत्याही कोठडीत असेल तर पोलिसांनी केलेली चौकशी किंवा अन्वेषण या व्यतिरिक्त तो अपराध ज्यांच्या स्थानिक अधिकारितेमध्ये करण्यात आला असेल अशा दंडाधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात येईल.
३) अशी चौकशी चालवणारा दंडाधिकारी त्यासंबंधात त्याने घेतलेला साक्षीपुरावा प्रकरणाच्या परिस्थितीप्रमाणे यात यापुढे विहित केलेल्या कोणत्याही रीतीने नोंदून घेईल.
४) जिला आधीच पुरण्यात आले असेल अशा कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूचे कारण शोधून काढण्यासाठी तिच्या मृतदेहाची तपासणी करणे हे जेव्हा केव्हा अशा दंडाधिकाऱ्याला समयोचित वाटेल तेव्हा, दंडाधिकारी तो मृतदेह उकरावयास लावील व त्याची तपासणी करवील.
५) जेव्हा या कलमाखाली चौकशी करावयाची असेल तेव्हा, दंडाधिकारी, व्यवहार्य असेल तेव्हा तेव्हा मृताच्या ज्या नातलगांची नावे व पत्ते माहीत असतील त्यांना तसे कळवील व त्यांना चौकशीच्या वेळी उपस्थित राहण्याची मुभा देईल.
६) पोटकलम (२) अन्वये चौकशी किंवा अन्वेषण करणारा दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यापासून चोवीस तासांत मृतदेह तपासणी केली जाण्यासाठी सर्वांत जवळच्या जिल्हा शल्यचिकित्सकाकडे किंवा राज्य शासन याबाबतीत नियुक्त करील अशा इतर अर्हताप्राप्त वैद्यकीय व्यक्तीकडे पाठविण्यात येईल, तसे करणे कोणत्याही कारणासाठी शक्य नसल्यास ती कारणे लेखी नमूद करण्यात यावी.
स्पष्टीकरण :
या कलमात,नातलग या शब्दप्रयोगाचा अर्थ आई-बाप, अपत्ये, भाऊ, बहिण व पती व पत्नी असा आहे.

Leave a Reply