भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १८५ :
पोलीस अधिकाऱ्याने घ्यावयाची झडती :
१) जेव्हा केव्हा पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला किंवा अन्वेषण करण्याऱ्या पोलीस अधिकाऱ्याला, ज्या कोणत्याही अपराधाचे अन्वेषण करण्यास तो प्राधिकृत झाला असेल त्याचे अन्वेषण करण्याच्या प्रयोजनार्थ आवश्यक असलेली कोणतीही वस्तू तो ज्याचा अंमलदार आहे किंवा ज्याच्याशी संलग्न आहे त्या पोलीस ठाण्याच्या हद्दींच्या आतील कोणत्याही जागी सापडू शकेल व अशी वस्तू आपल्या मते गैरवाजवी विलंबाशिवाय अन्याथा मिळवणे शक्य नाही असे समजण्यास वाजवी आधारकारणे असतील तेव्हा, असा अधिकारी केस डायरी मध्ये तसा आपला समज होण्याची आधारकारणे लेखी नोंदवून शक्य असेल तेथवर अशा लेखात, ज्या वस्तूसाठी झडती घ्यावयाची ती विनिर्दिष्ट करून नंतर, अशा वस्तूसाठी अशा ठाण्याच्या हद्दींच्या आतील कोणत्याही जागेची स्वत: किंवा दुसऱ्याकरवी झडती घेईल.
२) पोटकलम (१) खाली कार्यवाही करणारा पोलीस अधिकारी, व्यवहार्य असेल तर, जातीने झडतीचे काम चालवील :
परंतु या कलमा अतंर्गत केलेली झडती शक्यतो सेलफोन द्वारे दृश्य-श्राव्य (ऑडियो-व्हिडियो) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे रेकॉर्ड केले जाईल.
३) जर तो जातीने झडती घेण्यास असमर्थ असून झडती घेण्यास सक्षम अशी अन्य कोणीही व्यक्ती त्या वेळी उपस्थित नसेल तर, तो तसे करण्याची आपली कारणे लेखी नोंदवून, आपणांस दुय्यम असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला झडती घेण्यास फर्मावू शकेल, आणि अशा दुय्यम अधिकाऱ्याकडे तो झडती घ्यावयाची जाग आणि, शक्य असेल तेथवर, ज्या वस्तूसाठी झडती घ्यावयाची आहे ती विनिर्दिष्ट करून लेखी आदेश देईल; आणि अशा दुय्यम अधिकाऱ्यास तदनंतर अशा वस्तूसाठी अशा जागी झडती घेता येईल.
४) झडती – वॉरंटाबाबतचे या संहितेतील उपबंध आणि झडतीबाबत कलम १०३ मध्ये अंतर्भूत असलेले सर्वसाधारण उपबंध हे, शक्य तेथवर, या कलमाखाली घेतल्या जाणाऱ्या झडतीस लागू असतील.
५) पोटकलम (१) किंवा पोटकलम (३) खाली केलेल्या कोणत्याही नोंदीच्या प्रती, त्या अपराधाची दखल घेण्याचा अधिकार प्रदान झालेल्या सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्याकडे तत्काळ, परंतु ४८ (अठ्ठेचाळीस) तासांनतर नव्हे, पाठवण्यात येतील, आणि झडती घेतलेल्या जागेची मालकाला किंवा ताबाधारकाला त्याच्या अर्जावरून त्या नोंदीची एक प्रत विनामूल्या पुरवली जाईल.