Bnss कलम १८३ : कबुलीजबाब आणि जबाब नोंदुन घेणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १८३ :
कबुलीजबाब आणि जबाब नोंदुन घेणे :
१) जिल्ह्यातील कोणताही दंडाधिकारी ज्यामध्ये गुन्हा नोंदविला गेला आहे, मग त्याला त्या प्रकरणात अधिकारिता असो वा नसो- या प्रकरणाखालील किंवा त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याखालील अन्वेषणाच्या ओघात किंवा त्यानंतर चौकशी किंवा संपरिक्षा सुरू होण्यापूर्वी कोणत्याही वेळी त्यास दिलेला कोणताही कबुलीजबाब किंवा जबाब नोंदून घेता येईल :
परंतु, या पोटकलमान्वये दिलेला कोणताही कबुलीजबाब किंवा जबाब, अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या वकिलाच्या उपस्थितीत श्रव्य-दृश्य (ऑडियो व्हिडियो) इलैक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून देखील नोंदविण्यात येईल :
परंतु आणखी असे की, त्या त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याखाली ज्याला दंडाधिकऱ्याचे कोणतेही अधिकार प्रदान केलेले असतील अशा पोलीस अधिकाऱ्याला कोणताही कबुलजबाब नोंदविता येणार नाही.
२) असा कोणताही कबुलीजबाब नोंदून घेण्यापूर्वी दंडाधिकारी तो कबुलीजबाब देणाऱ्या व्यक्तीस असे स्पष्ट करील की, ती कबुलीजबाब देण्यास बांधलेली नाही आणि तिने तसा तो दिल्यास तो तिच्याविरूध्द पुरावा म्हणून वापरता येईल; आणि तो कबुलीजबाब देणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारून नंतर दंडाधिकाऱ्याला, तिने तो स्वेच्छेने दिला आहे असे सकारण वाटल्याशिवाय तो दंडाधिकारी असा कोणताही कबुलीजबाब नोंदुन घेणार नाही.
३) कबुलीजबाब नोंदण्यापूर्वी कोणत्याही वेळी जर दंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित होणाऱ्या व्यक्तीने, कबुलीजबाब देण्याची आपली इच्छा नाही असे सांगितले तर, दंडाधिकारी अशा व्यक्तीस पोलिसांच्या हवालतीत स्थानबध्द करण्यास प्राधिकृती देणार नाही.
४) असा कोणताही कबुलीजबाब आरोपी व्यक्तीच्या तपासणीची नोंद करण्यासाठी कलम ३१६ मध्ये उपबंधित केलेल्या रीतीने नोंदण्यात येईल आणि कबुलीजबाब देणाऱ्या व्यक्तीला तो स्वाक्षरित करावा लागेल; आणि तो दंडाधिकारी अशा नोंदीच्या तळाशी पुढील आशयाचे टिपण करील : –
( नाव)… ला मी असे स्पष्ट केले आहे की, तो कबुलीजबाब देण्यास बांधलेला नाही आणि त्याने तो दिला तर, तो देईल असा कोणताही कबुलीजबाब त्याच्याविरूध्द पुरावा म्हणून वापरता येईल, आणि हा कबुलीजबाब स्वेच्छेने दिलेला होता असे मी समजतो. तो माझ्या समक्ष व मला ऐकू येईल अशा रीतीने घेण्यात आला व तो देणाऱ्या व्यक्तीस वाचून दाखवण्यात आला आणि तो बरोबर असल्याचे तिने मान्य केले, आणि त्यात तिने दिलेल्या जबाबाचा संपूर्ण व खरा वृत्तांत अंतर्भूत आहे.
(स्वाक्षरी )
क.ख. दंडाधिकारी.
५) पोटकलम (१) खाली दिलेला (कबुलीजबाबाहून अन्य ) कोणताही जबाब साक्षीपुराव्याची नोंद करण्यासाठी यात यापुढे उपबंधित केलेली जी रीत दंडाधिकाऱ्याच्या मते त्या प्रकरणाच्या परिस्थितीत सर्वथैव योग्य असेल तशा रीतीने नोंदण्यात येईल; आणि याप्रमाणे ज्या व्यक्तीचा जबाब नोंदण्यात आला असेल तिला शपथ देवविण्याचा दंडाधिकाऱ्यास अधिकार असेल.
६) (a) क) (अ) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ६९, कलम ७०, कलम ७१, कलम ७४, कलम ७५, कलम ७६, कलम ७७, कलम ७८ किंवा कलम १२४ अन्वये शिक्षायोग्य असणाऱ्या प्रकरणांच्या बाबतीत, जिच्या बाबतीत असा अपराध करण्यात आला असेल अशा व्यक्तीचा जबाब, दंडाधिकारी, असा अपराध पोलिसांच्या निदर्शनास आणण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर पोट कलम (५) मध्ये विहित करण्यात आलेल्या रीतीने नोंदवील :
परन्तु असे जबाब (कथन), जोपर्यंत व्यवहार्य आहे, महिला दंडाधिकारी आणि तिच्या अनुपस्थितीत स्त्रीच्या उपस्थितीत पुरुष दंडाधिकाऱ्या द्वारे नोंदवले जाऊ शकेल :
परन्तु आणखी असे की, दहा वर्षे किंवा त्याहून अधिक कारावास किंवा आजीवन कारावास किंवा मृत्युदंडाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणात, दंडाधिकारी पोलिस अधिकाऱ्याने त्याच्यासमोर आणलेल्या पुराव्याचे जबाब (कथन) नोंदविल :
परंतु आणखी असे की, जर जबाब देणारी व्यक्ती, तात्पुरती किंवा कायम स्वरूपात मानसिकदृष्टया किंवा शारीरिकदृष्टया अपंग झाली असेल तर, तो दंडाधिकारी जबाब नोंदवून घेण्यासाठी दुभाष्याचे किंवा विशेष शिक्षण देणाऱ्याचे साहाय्य घेईल :
परंतु आणखी असे की, जर जबाब देणारी व्यक्ती, तात्पुरती किंवा कायमस्वरूपात मानसिकदृष्टया किंवा शारीरिकदृष्टया अपंग झालेली असेल तर, त्या व्यक्तीने दुभाष्याच्या किंवा विशेष शिक्षण देणाऱ्याच्या मदतीने दिलेल्या जबाबचे कोणत्याही दृश्य-श्राव्य (ऑडिया व्हिडियो) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे, शक्यतो मोबाईल फोनद्वारे रेकॉर्ड (जतन करणे / नोंद करणे) केले जाईल.
(b) ख) (ब) जी तात्पुरती किंवा कायमस्वरूपी मानसिकदृष्टया किंवा शारीरिकदृष्टया अपंग झालेली असेल अशा व्यक्तीचा खंड (a) (क) खाली लेखनिविष्ट केलेला जबाब हा, भारतीय साक्ष्य अधिनियम २०२३ याच्या कलम १४२ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या सरतपासणीच्या ऐवजी दिलेला जबाब असल्याचे मानण्यात येईल, अशा जबाब देणाऱ्याची अशा जबाबावर उलटतपासणी घेता येईल, न्यायचौकशी दरम्यान त्याचे रेकॉर्डिग करण्याची गरज असणार नाही.
६) या कलमाखाली कबुलीजबाब किंवा जबाब नोंदणारा दंडाधिकारी, ज्याने त्या प्रकरणाची चौकशी किंवा संपरीक्षा करावयाची असेल त्या दंडाधिकाऱ्याकडे तो पाठवील.

Leave a Reply