भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १६७ :
स्थानिक चौकशी :
१) जेव्हा केव्हा कलम १६४, कलम १६५ किंवा कलम १६६ यांच्या प्रयोजनांसाठी स्थानिक चौकशी जरूरीची असेल तेव्हा, दंडाधिकारी किंवा उप-विभागीय दंडाधिकारी चौकशी करण्याकरता त्यास दुय्यम असलेल्या कोणत्याही दंडाधिकाऱ्यास प्रतिनियुक्त करू शकेल व त्याच्या मार्गदर्शनासाठी जरूरीचे वाटतील असे लेखी अनुदेश त्याला देऊ शकेल आणि चौकशीचा जरूर तो संपूर्ण खर्च किंवा त्याचा कोणताही भाग कोणी द्यावा ते घोषित करू शकेल.
२) याप्रमाणे प्रतिनियुक्त केलेल्या व्यक्तीचा अहवाल हा त्या प्रकरणातील पुरावा म्हणून समजण्यात येईल.
३) जेव्हा कलम १६४, कलम १६५ किंवा कलम १६६ खालील कार्यवाहीतील कोणत्याही पक्षाला काही खर्च आलेला असेल तेव्हा, निर्णय देणारा दंडाधिकारी असा खर्च कोणी द्यावयाचा- अशा पक्षाने की कार्यवाहीतील अन्य कोणत्याही पक्षाने, आणि तो संपूर्णपणे की अंशत:की यताप्रमाण द्यावयाचा याबाबत निदेश देऊ शकेल आणि अशा खर्चात साक्षीदारांबाबत व वकिलांच्या फी बाबत आलेला, न्यायालयाला वाजवी वाटेल इतक्या मर्यादेपर्यंत कोणताही खर्च समाविष्ट असू शकेल.