भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १२६ :
अन्य प्रसंगी शांतता राखण्यासाठी जामीन :
१) कोणतीही व्यक्ती शांतताभंग करण्याचा किंवा सार्वजनिक प्रशांतता बिघडवण्याचा अथवा ज्यामुळे संभवत: शांतताभंग घडून घेईल किंवा सार्वजनिक प्रशांतता बिघडेल असे कोणतेही गैर कृत्य करण्याचा संभव आहे अशी जेव्हा कार्यकारी दंडाधिकाऱ्याला खबर मिळाली असेल आणि पुढील कार्यवाही करण्यास पुरेसे कारण आहे असे त्याचे मत असेल तेव्हा, यात यापुढे उपबंधित केलेल्या रीतीने तो दंडाधिकारी, त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त एक वर्षाच्या कालावधीपुरते शांतता राखण्यासाठी, बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित करण्याचा आदेश अशा व्यक्तीला का देऊ नये याचे कारण दाखवण्यास त्या व्यक्तीला फर्मावू शकेल.
२) जेथे शांतताभंगाची किंवा विक्षोभाची आशंका आहे असे कोणतेही स्थळ कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या स्थानिक अधिकारितेत असेल अथवा जी व्यक्ती अशा अधिकारितपलीकडे शांतता भंग करण्याचा किंवा सार्वजनिक प्रशांतता बिघडवण्याचा किंवा पूर्वोक्त असे कोणतेही गैर कृत्य करण्याचा संभव आहे ती व्यक्ती अशा स्थानिक अधिकारितेत असेल तेव्हा, या कलमाखालील कार्यवाही त्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर करता येईल.