भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४२५ :
अपील विनासोपस्कार खारीज करणे:
१) जर कलम ४२३ किंवा कलम ४२४ खाली मिळालेल्या व अपील विनंतीअर्जाचे व न्यायनिर्णयाच्या प्रतीचे परीक्षण केल्यावर अपील न्यायालयाला हस्तक्षेप करण्यास पुरेसे कारण नाही असे वाटले तर, त्यास अपील विनासोपस्कार खारीज करता येईल, परंतु,
(a) क) (अ) कलम ४२३ खाली सादर केलेले कोणतेही अपील, हे अपीलकर्त्यांला किंवा त्याच्या वकिलाला त्या अपिलाच्या पुष्टयर्थ आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी मिळाल्याशिवाय खारीज केले जाणार नाही;
(b) ख) (ब) कलम ४२४ खाली सादर केलेले कोणतेही अपील हे अपीलकर्त्याला त्या अपिलाच्या पुष्टयर्थ आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्याखेरीज खारीज केले जाणार नाही. मात्र ते क्षुल्लक आहे किंवा हवालतीतील आरोपीला न्यायालयापुढे हजर करण्याने त्या प्रकरणाच्या परिस्थितीच्या मानाने फारच गैरसोय होणार आहे असे अपील न्यायालयाला वाटले तर गोष्ट वेगळी.
(c) ग) (क) कलम ४२४ खाली सादर केलेले कोणतेही अपील सादर करण्यासाठी दिलेला कालावधी संपेपर्यंत असे कोणतेही अपील विनासोपस्कार खारीज केले जाणार नाही.
२) या कलमाखाली अपील खारीज करण्यापूर्वी न्यायालयाला त्या खटल्याचा अभिलेख मागवता येईल.
३) जेव्हा या कलमाखाली अपील खारीज करणारे अपील न्यायालय हे सत्र न्यायालय किंवा मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याचे न्यायालय असेल तेव्हा, ते तसे करण्याची आपली कारणे नमूद करील.
४) जेव्हा कलम ४२४ खाली सादर केलेले अपील या कलमाखाली विनासोपस्कार खारीज केले जाईल व कलम ४२३ खाली त्याच अपीलकर्त्याच्या वतीने रीतसर सादर केलेला दुसरा अपील विनंती अर्ज आपण विचारात घेतलेला नाही असे अपील न्यायालयाला आढळून येईल तेव्हा, कलम ४३४ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, कायद्यानुसार अशा अपिलाची सुनावणी व निकाल करणे हे न्यायहितार्थ जरूरीचे आहे अशी त्या न्यायालयाची खात्री पटली तर, त्याला तसे करता येईल.