Bnss कलम १९२ : तपासामधील कार्यवाहीचा रोजनामा-केस डायरी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १९२ :
तपासामधील कार्यवाहीचा रोजनामा-केस डायरी :
१) या प्रकरणाखाली अन्वेषण करणारा प्रत्येक पोलीस अधिकारी रोजनाम्यात कोणत्या वेळी त्याला खबल मिळाली, कोणत्या वेळी त्याने आपल्या अन्वेषणास सुरूवात केली व ते केव्हा संपवले कोणत्या स्थळाला किंवा स्थळांना त्याने भेट दिली हे नमूद करून अन्वेषणातील आपल्या कार्यवाहीची व आपल्या अन्वेषणातून ज्या परिस्थितीची खातरजमा झाली तिच्याबाबतच्या निवेदनाची रोजच्या रोज नोंद करील.
२) कलम १८० अन्वये अन्वेषण करताना नोंदविलेले साक्षीदारांचे जाबजबाब, केस डायरीमध्ये समाविष्ट करण्यात येतील.
३) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेली डायरी एका खंडामध्ये असेल आणि तिच्यावर यथोचितपणे पुष्ठक्रमांक देण्यात येतील.)
४) कोणत्याही फौजदारी न्यायालयाला अशा न्यायालयात चौकशी किंवा संपरीक्षा चालू असलेल्या प्रकरणाविषयीचे पोलीस रोजनामे मागवता येतील व असे रोजनामे प्रकरणातील पुरावा म्हणून नव्हे, तर अशा चौकशीच्या किंवा संपरीक्षेच्या कामी आपल्याला मदत म्हणून वापता येतील.
५) आरोपी किंवा त्याचे प्रतिनिधीही असे रोजनामे मागवण्यास हक्कदार असणार नाहीत, तसेच केवळ न्यायालयाने त्याचा निर्देश केला आहे एवढ्यावरून ते बघण्यास तो किंवा हक्कदार होणार नाहीत; पण ज्या पोलीस अधिकाऱ्याने ते लिहिले त्याने जर आपल्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ते वापरले किंवा न्यायालयाने अशा पोलीस अधिकाऱ्याच्या कथनांतील विरोध दाखवून देण्यासाठी ते वापरले तर, भारतीय साक्ष्य अधिनियम २०२३ याच्या कलम १६४ किंवा प्रकरणपरत्वें, कलम १४८ चे उपबंध लागू होतील.

Leave a Reply