भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ७९ :
स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती करणे :
कलम : ७९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने कोणताही शब्द उच्चारणे किंवा कोणताही हावभाव करणे.
शिक्षा : ३ वर्षांचा साधा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : जिचा विनयभंग करण्याचा उद्देश होता किंवा जिच्या एकांतपणाचा भंग झाला ती स्त्री.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कोणत्याही स्त्रीचा विनयभंग करण्यासाठी जो कोणी, एखादा शब्द किंवा आवाज अशा स्त्रीच्या कानावर पडावा अथवा एखादा हावभाव किंवा वस्तू तिच्या नजरेला पडावी या उद्देशाने असा शब्द उच्चारील, असा आवाज किंवा हावभाव करील किंवा, अशी वस्तू कोणत्याही स्वरुपात प्रदर्शित करील, अगर अशा स्त्रीच्या एकांतपणाचा भंग करील त्याला तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची शिक्षा होईल आणि तसेच तो द्रव्यदंडासही पात्र होईल.