भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ६४ :
बलात्कारासाठी शिक्षा :
कलम : ६४ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बलात्कार.
शिक्षा : किमान १० वर्षांचा सश्रम कारावास किंवा कमाल आजीवन कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
——–
कलम : ६४ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : पोलीस अधिकारी किंवा लोकसेवक किंवा सशस्त्र दलातील सदस्य किंवा कारागृह सुधारगृह किंवा हवालतीची इतर ठिकाणे, महिलांच्या किंवा मुलांच्या संस्था यांच्या व्यवस्थापनावरील व्यक्ती किंवा कर्मचारीवर्गातील व्यक्ती किंवा रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर किंवा कर्मचारी वर्गात असताना एखाद्या व्यक्तीने बलात्कार केला असेल किंवा बलात्कारित व्यक्तीचा विश्वस्त किंवा प्राधिकारी या स्थितीत असताना बलात्कार केला असेल किंवा बलात्कारित व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईक व्यक्तीने बलात्कार केला असेल.
शिक्षा : किमान १० वर्षांचा सश्रम कारावास किंवा कमाल नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित भागासाठी कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय
———
१) जो कोणी, पोटकलम (२) मध्ये तरतूद करण्यात आलेली प्रकरणे वगळून अन्य बाबतीत बलात्कार करील त्याला १० वर्षांपेक्षा कमी नाही परंतु आजीव कारावासापर्यंत असू शकेल अशी कोणत्याही एका वर्णनाच्या सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.
२) जो कोणी-
(a) क) (अ) पोलीस अधिकारी असताना –
एक) अशा पोलीस अधिकाऱ्याची ज्या पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली असेल त्या पोलीस ठाण्याचा हद्दींमध्ये; किंवा
दोन) कोणत्याही ठाणेगृहाच्या परिवास्तुत; किंवा
तीन) अशा पोलीस अधिकाऱ्याच्या किंवा अशा पोलीस अधिकाऱ्याला दुय्यम असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या ताब्यातील स्त्रीवर बलात्कार करील; किंवा
(b) ख) (ब) लोकसेवक असताना, अशा लोकसेवकाच्या किंवा अशा लोकसेवकाला दुय्यम असलेल्या लोकसेवकाच्या ताब्यात असलेल्या स्त्रीवर बलात्कार करील; किंवा
(c) ग) (क) केंद्र किंवा राज्य शासनाने एखाद्या क्षेत्रात तैनात केलेला सशस्त्र दलातील सदस्य असताना अशा क्षेत्रात बलात्कार करील; किंवा
(d) घ) (ड) तुरंग, सुधारगृह किंवा त्यावेळी अमलात असलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये स्थापन केलेली इतर कोणतीही हवालात किंवा महिलांच्या किंवा संस्थेच्या व्यवस्थापनावर किंवा कर्मचारी वर्गात असताना अशा तुरुंगातील, सुधारगृहातील, ठिकाणातील किंवा संस्थेतील कोणत्याही अंतर्वासीवर बलात्कार करील; किंवा
(e) ङ) (इ) रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर किंवा कर्मचारीवर्गात असताना रुग्णालयातील महिलेवर बलात्कार करील; किंवा
(f) च) (फ) एखाद्या महिलेचा नातेवाईक, पालक किंवा शिक्षक असताना किंवा त्या महिलेचा विश्वस्त किंवा प्राधिकारी या स्थितीतील व्यक्ती असताना अशा महिलेवर बलात्कार करील; किंवा
(g) छ) (ग) जातीय किंवा सांप्रदायिक दंगलीमध्ये बलात्कार करील; किंवा
(h) ज) (ह) एखादी स्त्री गरोदर आहे हे माहीत असताना त्या स्त्रीवर बलात्कार करील; किंवा
(i) झ) (आय) संमती देण्यास अक्षम असलेल्या स्त्रीवर बलात्कार करील; किंवा
(j) ञ) (जे) एखाद्या स्त्रीवर नियंत्रण किंवा वर्चस्व ठेवण्याचा स्थितीत असताना अशा स्त्रीवर बलात्कार करील; किंवा
(k) ट) (के) मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या स्त्रीवर बलात्कार करील; किंवा
(l) ठ) (एल) बलात्कार करताना त्या स्त्रीला गंभीर शारीरिक दुखापत करील किंवा पंगू करील किंवा विद्रूप करील किंवा एखाद्या स्त्रीच्या जीवनास धोका निर्माण करील; किंवा
(m) ड) (एम) एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करील,
त्याला दहा वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल अशी म्हणजे, त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित भागासाठी सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी –
(a) क) (अ) सशस्त्र दल म्हणजे, नौदल, सेवा व वायुदल आणि त्यात त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे घटित केलेल्या सशस्त्र दलाचा तसेच, जे केंद्र शासनाच्या किंवा राज्यशासनाच्या नियंत्रणाखाली असते असे संसदीय दल व कोणतेही सहायक दल यांचाही समावेश होतो;
(b) ख) (ब) रुग्णालय म्हणजे, रुग्णालयाची प्रसीमा आणि त्यात, व्यक्तींना दुखवण्यात बरे होत असताना उपचारासाठी किंवा वैद्यकीय देखभाल किंवा पुनर्वसनाची गरज असणाऱ्यांना दाखल करुन घेणाऱ्या संस्थांच्या प्रसीमांचाही समावेश होतो;
(c) ग) (क) पोलीस अधिकारी या संज्ञेला, पोलीस अधिनियम, १८६१ मध्ये पोलीस या संज्ञेला जो अर्थ नेमून दिला आहे तोच अर्थ असेल;
(d) घ) (ड) महिलांची किंवा मुलांची संख्या म्हणजे, अनाथालय, उपेक्षित महिलांसाठी किंवा मुलांसाठी गृह, किंवा विधवा गृह यापैकी कोणत्याही नावाने संबोधण्यात येणारी संस्था किंवा महिला किंवा मुलांचा स्वीकार करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी जी स्थापन करण्यात आलेली आहे आणि जिची व्यवस्था पाहण्यात येत आहे अशी इतर कोणत्याही नावाने संबोधण्यात येणारी संस्था.