भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण ५ :
स्त्री आणि बालकां विरुद्ध अपराधांविषयी :
लैंगिक (यौन) अपराधांविषयी :
कलम ६३ :
बलात्कार (बलात्संग) :
एखादा पुरुष जर –
(a) क) (अ) आपले शिस्न एखाद्या स्त्रीच्या योनीमार्गात, तोंडात, मूत्रमार्गात किंवा गुदद्वारात कोणत्याही प्रमाणात घुसवील किंवा तिला त्याच्याशी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी तसे करण्यास भाग पाडील; किंवा
(b) ख) (ब) कोणतीही वस्तू किंवा शिस्न नसेल असा शरीराचा एखादा भाग एखाद्या स्त्रीच्या योनीमार्गात, मूत्रमार्गात किंवा गुदद्वारात कोणत्याही प्रमाणात घुसवील किंवा तिला त्याच्याशी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी तसे करण्यास भाग पाडील; किंवा
(c) ग) (क) एखाद्या स्त्रीच्या शरीराचा कोणताही भाग अशा रीतीने हाताळील की तो तिच्या योनीमार्गात, मूत्रमार्गात किंवा गुदद्वारात घुसवला जाईल किंवा तिला त्याच्याबरोबर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीबरोबर तसे करण्यास भाग पाडील; किंवा
(d) घ) (ड) आपले तोंड एखाद्या स्त्रीच्या योनीमार्गाला, गुदद्वाराला, मूत्रमार्गाला लावील किंवा तिला त्याच्याशी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीबरोबर तसे करण्यास भाग पाडील तर,-
एक) तिच्या इच्छेविरुद्ध.
दोन) तिच्या संमतीविना.
तीन) जेव्हा तिला किंवा तिचे हितसंबंध जिच्यामध्ये गुंतलेले असतील अशा कोणत्याही व्यक्तीला मृत्यूच्या किंवा जखमी करण्याच्या भीतीखाली ठेवून तिची संमती मिळवली असेल अशा बाबतीत, तिच्या संमतीने.
चार) आपण तिचा पती नाही आणि ती ज्याच्याशी कायदेशीरपणे विवाहबद्ध झाली आहे किंवा तसे ती समजते असा अन्य पुरुष म्हणजे आपणच होय असे ती समजून चालली असल्याने तिने संमती दिली आहे हे जेव्हा त्या पुरषाला माहीत असते तेव्हा, तिच्या संमतीने.
पाच) संमती देण्याच्यावेळी, मनोविकलतेमुळे किंवा नशेत असल्यामुळे किंवा त्याने स्वत: किंवा अन्य व्यक्तीमार्फत कोणतेही मती गुंग करणारे किंवा अपथ्यकारक पदार्थ सेवन करण्यास दिल्यामुळे, ती ज्या गोष्टीसाठी संमती देत आहे त्याचे स्वरुप व परिणाम जाणण्यास ती असमर्थ असताना, तिच्या संमतीने.
सहा) ती अठरापेक्षा कमी वयाची असताना तिच्या संमतीने किंवा तिच्या संमतीविना.
सात) ती संमती सूचित करण्यास असमर्थ असताना,
यापैकी कोणतीही परिस्थिती असताना त्याने वरील कृती केली असल्यास त्याने बलात्कार केला असे म्हणण्यात येईल.
स्पष्टीकरण १ :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, योनीमार्ग या संज्ञेत बृहत भगोष्ठ (लॅबिया मजोरा) चा समावेश होतो.
स्पष्टीकरण २ :
संमती म्हणजे, जेव्हा स्त्री, शब्दांद्वारे, हावभावाद्वारे, हालचालीद्वारे किंवा शाब्दिक किंवा अशाब्दिक संसूचित करण्याच्या कोणत्याही प्रकाराद्वारे विशिष्ट लैंगिक कृतीमध्ये सहभागी होण्याची आपली इच्छा दर्शवील अशी असंदिग्ध स्वेच्छापूर्वक सहमती होय :
परंतु असे की, एखाद्या स्त्रीने अशा अंतर्वेशनाला (आत घुसण्याला) शरीरोने प्रतिबंध केला नाही तर केवळ त्या कारणासाठी ती लैंगिक कृतींना संमती देते असे मानण्यात येणार नाही.
अपवाद १ :
वैद्यकीय प्रक्रिया किंवा अंतर्वेशन (हस्तक्षेप) हे बलात्कार असणार नाही.
अपवाद २ :
पुरुषाने आपल्या स्वत:च्या अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या नसेल अशा पत्नीबरोबर केलेला संभोग किंवा लैंगिक कृती हा बलात्कार असणार नाही.