भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ५३ :
अपप्रेरित (चिथावणीच्या) कृतीमुळे घडून आलेल्या, पण अपप्रेरकाला (चिथावणी देणाऱ्याला) उद्देशित असलेल्या कृतीहून भिन्न अशा परिणामाबद्दल अपप्रेरकाचे (चिथावणी देणाऱ्याचे) दायित्व (जबाबदारी) :
कलम : ५३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही अपराधाचे अपप्रेरण – अपप्रेरित कृतीमुळे घडून आलेला पण अपप्रेरकाला उद्देशित असलेल्या कृतीहून भिन्न असा परिणाम घडून आला असेल तेव्हा.
शिक्षा : केलल्या अपराधाला असेल तीच.
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अपप्रेरित अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
जेव्हा एखादा विशिष्ट परिणाम घडवून आणण्याचा अपप्रेरकाचा (चिथावणी देणाऱ्याचा) उद्देश असताना एखाद्या कृतीस अपप्रेरणा (चिथावणी) दिली जाते आणि अपप्रेरणाचा (चिथावणीचा) परिणाम म्हणून ज्या कृतीबद्दल अपप्रेरक (चिथावणी देणारा) दायी होतो तिच्यामुळे अपप्रेरकाला (चिथावणी देणाऱ्याला) उद्देशित असलेल्यापेक्षा भिन्न परिणाम घडून येतो तेव्हा, अपप्रेरित (चिथावणीच्या) कृतीमुळे तो परिणाम घडून येणे संभवनीय आहे याची अपप्रेरकाला (चिथावणी देणाऱ्याला) जाणीव होती असे असल्यास, घडून आलेल्या परिणामाबद्दल, जणू काही तो परिणाम घडवून आणण्याच्या उद्देशानेच त्याने त्या कृतीस अपप्रेरणा (चिथावणी) दिली असावी त्याप्रमाणे त्याच रीतीने व त्याच व्याप्तीपर्यंत तो दायी होतो.
उदाहरण :
(य) ला जबर दुखापत करण्यास (क) हा (ख) ला चिथावणी देतो. चिथावणीचा परिणाम म्हणून (ख) हा (य) ला जबर दुखापत करतो. परिणामी (य) मरण पावतो. याबाबतीत, जबर दुखापतीच्या अपप्रेरित कृतीमुळे मृत्यु घडून येणे संभवनीय आहे याची (क) ला जाणीव होती असे असेल तर, (क) हा खुनासाठी उपबंधित केलेल्या शिक्षेस पात्र आहे.