भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ४६ :
अपप्रेरक (चिथावणी देणारा / दुष्प्रेरक) :
जी व्यक्ती एखादा अपराध करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देते अथवा अपराध करण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीने अपप्रेरकाप्रमाणे (चिथावणी देणाऱ्याप्रमाणेच) त्याच उद्देशाने किंवा जाणिवेने केल्यास जी कृती अपराध ठरेल ती कृती करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देते त्या व्यक्तीने त्या अपराधाचे अपप्रेरण (चिथावणीकरण) केले असे होते.
स्पष्टीकरण १:
अपप्रेरक (चिथावणी देणारा) स्वत: एखादी कृती करण्यास बद्ध (बांधलेला) नसला, तरीही ती कृती अवैधपणे (बेकायदेशीरपणे) टाळण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे हा अपराध ठरू शकेल.
स्पष्टीकरण २:
अपप्रेरण हे (चिथावणीकरण) हे अपराध ठरण्यासाठी अपप्रेरित कृत्य (चिथावणी दिलेले कृत्य) केले गेले पाहिजे किंवा अपराध ठरण्यासाठी आवश्यक तो परिणाम घडवून आणला गेला पाहिजे याची आवश्यकता नाही.
उदाहरणे :
(a) क) (क) हा (ख) ला (ग) चा खून करण्यास चिथावणी देतो. (क) हा (ख) ला खून करण्यास अपप्रेरणा दिल्याबद्दल दोषी आहे.
(b) ख) (क) हा (ख) ला (घ) चा खून करण्यास चिथावणी देतो. (ख) हा चिथावणीप्रमाणे (घ) ला भोसकतो. (घ) ची जखम बरी होते. (क) हा (ख) ला खून करण्यास चिथावणी दिल्याबद्दल दोषी आहे.
स्पष्टीकरण ३:
अप्रेरित (चिथावणी दिलेल्या) व्यक्तीकडे अपराध करण्याची विधित: (कायदेशीर) क्षमता असली पाहिजे अथवा तिच्या ठायी अपप्रेरकाचाच (चिथावणी देणाऱ्याचाच) गुन्हेगारी उद्देश किंवा जाणीव अगर इतर कोणताही गुन्हेगारी उद्देश किंवा जाणीव असली पाहिजे, अशी आवश्यकता नाही.
उदाहरणे :
(a) क) अपराध करण्याची विधित: क्षमता असणाऱ्यां आणि (क) सारखा उद्देश असणाऱ्यां व्यक्तीने जी कृती केल्यास अपराध होईल ती कृती करण्यास (क) हा गुन्हेगारी उद्देशाने एखाद्या बालकाला किंवा मनोविकल असलेल्या व्यक्तीला अपप्रेरणा देतो. येथे कृती करण्यात येवो वा न येवो – (क) हा अपराध अपप्रेरणा दिल्याबद्दल दोषी आहे.
(b) ख) (क) हा (य) चा खून करण्याच्या उद्देशाने, (य) च्या मृत्यूस कारणीभूत होईल अशी कृती करण्यास (ख) या सात वर्षे वयाखालील मुलाला चिथावणी देतो. चिथावणीचा परिणाम म्हणून (क) च्या अनुपस्थितीत (ख) ती कृती करतो आणि त्यामुळे (य) च्या मृत्यूला कारण होतो. येथे, (ख) कडे अपराध करण्याची विधित: क्षमता नव्हती तरी जणू काही (ख) कडे अपराध करण्याची विधित: क्षमता असावी आणी त्याने खून केलेला असावा अशा प्रकारे त्याच रीतीने शिक्षा होण्यास (क) पात्र आहे आणि म्हणून तो मृत्यूच्या शिक्षेस पात्र आहे.
(c) ग) (क) हा (ख) ला एका राहत्या घराला आग लावण्यास चिथावणी देतो. (ख) त्याच्या मनोविकलतेमुळे त्या कृतीचे स्वरुप काय आहे हे किंवा आपण चुकीची किंवा कायद्याविरुद्ध असलेली गोष्ट करत आहोत हे जाणण्यास असमर्थ असून, (क) च्या चिथावणीचा परिणाम म्हणून घराला आग लावतो. (ख) ने कोणताही अपराध केलेला नाही, परंतु (क) हा राहत्या घराला आग लावण्याच्या अपराधाला अपप्रेरणा देण्याबद्दल दोषी आहे, आणि त्या अपराधासाठी उपबंधित केलेल्या शिक्षेस पात्र आहे.
(d) घ) (क) हा चोरी करण्याच्या उद्देशाने (य) च्या मालकीची मालमत्ता (य) च्या कब्जातून काढून घेण्यास (ख) ला चिथावणी देतो. (क) ती मालमत्ता (क) च्या मालकीची आहे असा (ख) चा समज करुन देतो. ती मालमत्ता (क) ची आहे असे खरोखर समजून (ख) ती मालमत्ता (य) च्या कब्जातून काढून घेतो. (य) चुकीच्या समजुतीने कृती करत असल्यामुळे, त्याने ती मालमत्ता अप्रामाणिकपणाने काढून घेतली असे होत नाही, आणि म्हणून त्याने चोरी केली असे होत नाही. परंतु (क) हा चोरीस अपप्रेरणा देण्याबद्दल दोषी आहे व तो जणू काही (ख) ने चोरी केलेली असावी त्याप्रमाणे त्याच शिक्षेला पात्र आहे.
स्पष्टीकरण ४:
अपराधास अपप्रेरणा (चिथावणी) देणे हा अपराध असल्या मुळे अशा अपप्रेरणास (चिथावणीस) अपप्रेरणा (चिथावणी) देणे हा देखील अपराध आहे.
उदाहरण :
(य) चा खून करण्यास (ग) ला चिथावणी देण्यासाठी (क) हा (ख) ला चिथावणी देतो. त्याप्रमाणे (ख) हा (य) चा खून करण्यास (ग) ला चिथावणी देतो आणि (ख) च्या चिथावणीच्या परिणामी (ग) तो अपराध करतो. (ख) हा त्याच्या अपराधाबद्दल खुनाची शिक्षा होण्यास पात्र आहे, आणि (क) ने (ख) ला अपराध करण्यास चिथावणी दिलेली असल्यामुळे (क) देखील त्याच शिक्षेला पात्र आहे.
स्पष्टीकरण ५:
कट करून अपप्रेरणा (चिथावणी) देण्याचा अपराध घडण्यासाठी, जी व्यक्ती अपराध करते त्या व्यक्तीशी अपप्रेरकाचा (चिथावणी देणाऱ्याचा) एकविचार झाला पाहिजे, अशी आवश्यकता नाही. ज्या कटाच्या अनुरोधाने अपराध करण्यात आला त्यामध्ये तो सामील असला तरी पुरेसे आहे.
उदाहरण :
(क) हा (ख) शी एकविचाराने (य) वर विषप्रयोग करण्याची योजना आखतो. (क) ने विष द्यावयाचे याबद्दल एकमत होते. नंतर (ख) हा एका तिऱ्हाईत व्यक्तीने विषय द्यावयाचे आहे असे सांगून पण (क) चा उल्लेख न करता (ग) ला ती योजना समजावून सांगतो. (ग) विष पैदा करण्याचे कबूल करतो आणि सांगितलेल्या पद्धतीने त्याचा वापर करण्यासाठी ते पैदा करुन (ख) कडे सुपूर्द करतो. (क) विष देतो. परिणामी (य) मरतो. येथे (क) आणि (ग) यांनी मिळून कट केलेला नसला तरी ज्याच्या अनुरोधाने (य) चा खून झाला त्या कटामध्ये (ग) सामील झालेला आहे. म्हणून, या कलमामध्ये व्याख्या केलेला अपराध (ग) ने केलेला आहे, आणि तो खुनाबद्दलच्या शिक्षेस पात्र आहे.