भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३७ :
ज्यांच्यापासून खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क नाही त्या कृती :
१) त्या कृतींपासून,
(a) क) (अ) ज्या कृतीमुळे मृत्युची किंवा जबर दुखापतीची वाजवी धास्ती निर्माण होत नाही ती कृती एखाद्या लोक सेवकाने आपल्या पदाधिकाराच्या आभासामुळे सद्भावपूर्वक कार्य करताना केलेली असेल किंवा करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर, ती कृती काटेकोरपणे विधित: (कायद्याने) समर्थनीय नसली तरी, खाजगीरीत्या बचाव करण्याचा कोणताही हक्क नाही.
(b) ख) (ब) ज्या कृतीमुळे मृत्युची किंवा जबर दुखापतीची वाजवी धास्ती निर्माण होत नाही ती कृती एखाद्या लोक सेवकाने आपल्या पदाधिकाराच्या आभासामुळे सद्भावपूर्वक कार्य करताना निदेशावरुन केलेली असेल किंवा करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर, तो निदेश काटेकोरपणे विधित: (कायद्याने) समर्थनीय नसला तरी, खाजगीरीत्या बचाव करण्याचा कोणताही हक्क नाही.
(c) ग) (क) लोक प्राधिकाऱ्यांच्या संरक्षणाचा अवलंब करण्याइतपत अवधी असेल त्या प्रकरणी, खाजगीरीत्या बचाव करण्याचा कोणताही हक्क नाही.
२) खाजगीरीत्या बचाव करण्याचा हक्क, बचावासाठी जितका अपाय करणे आवश्यक असेल त्याहून अधिक अपाय करता येण्याइतपत व्यापक नसतो.
स्पष्टीकरण१ :
एखादी व्यक्ती लोकसेवकाने लोक सेवक या नात्याने केलेल्या किंवा करण्याचा प्रयत्न केलेल्या कृतीपासून बचाव करण्याच्या हक्कापासून वंचित होत नाही; परंतु ती कृती करणारी व्यक्ती असा लोकेसेवक आहे याची तिला जाणीव किंवा तसे समजण्यास कारण असता कामा नये.
स्पष्टीकरण २ :
एखादी व्यक्ती लोकसेवकाच्या आदेशावरून केलेल्या किंवा करण्याचा प्रयत्न केलेल्या कृतीपासून बचावाच्या हक्कास वंचित होत नाही; परंतु ती करणारी व्यक्ती अशा आदेशावरून कृती करत आहे हे तिला माहीत असेल तर किंवा तसे समजण्यास कारण असेल तर गोष्ट वेगळी अथवा त्या इसमाने आपण कोणत्या प्राधिकारान्वये कृती करत आहोत हे सांगितले तर किंवा त्याच्याकडे लेखी प्राधिकारपत्र असल्यास, मागणी केली असता असे प्राधिकारपत्र काढून दाखविले तर गोष्ट वेगळी.