भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण १९ :
फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा करणे, अपमान करणे, त्रास देणे आणि अब्रुनुकसानी (मानहानी) इत्यादी याविषयी :
कलम ३५१ :
फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा :
कलम : ३५१ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : फौजदारीपात्र धाकदपटशा
शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : धाकदपटशा दाखवलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : ३५१ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मृत्यु किंवा जबर दुखापत घडवून आणणे इत्यादीची धमकी असल्यास.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : धाकदपटशा दाखवलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३५१ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : निनावी संदेशाद्वारे किंवा धमकी कोठून येते ते लपवून ठेवण्याची खबरदारी घेऊन फौजदारीपात्र धाकदपटशा करणे.
शिक्षा : पोटकलम (१) खालील शिक्षे सोबत २ वर्षाचा कारावास.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) जर कोणी दुसऱ्या व्यक्तीला तिचा देह, लौकिक किंवा मालमत्ता याबाबत, किंवा जिच्यामध्ये ती व्यक्ती हितसंबंधित आहे अशा कोणाचाही देह किंवा लौकिक याबाबत क्षती पोचवण्याची धमकी दिली आणि त्यामागे, त्या व्यक्तीला भयभीत करण्याचा, अथवा अशी धमकी अमलात येण्याचे टाळण्याकरिता साधन म्हणून, ती व्यक्ती जी कोणतीही कृती करण्यात विधित: बद्ध नाही ती कृती तिने करावी किंवा ती व्यक्ती जी कोणतीही कृती करण्यास विधित: हक्कदार आहे ती करण्याचे तिने चुकवावे अशी तिला सक्ती करण्याचा उद्देश असेल तर, त्याने फौजदारीपात्र धाकदपटशा केला असे होते.
स्पष्टीकरण :
धमकी दिली गेलेली व्यक्ती ज्या मृत व्यक्तीमध्ये हितसंबंधित असेल तिच्या लौकिकास क्षती पोचवण्याची धमकी ही या कलमाच्या कक्षेत आहे.
उदाहरण :
दिवाणी दावा चालू ठेवण्यापासून (ख) परावृत्त व्हावा यासाठी (क) हा (ख) चे घर जाळण्याची धमकी देतो. (क) हा फौजदारीपात्र धाकदपटशा केल्याबद्दल दोषी आहे.
२) जो कोणी फौजदारीपात्र धाकदपटशाचा अपराध करील त्याला दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
३) जर मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याची, अथवा आग लावून कोणतीही मालमत्ता नष्ट करण्याची, अथवा मृत्यूच्या किंवा आजन्म कारावासाच्या, किंवा सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध घडवण्याची, अथवा कोणत्याही स्त्रीवर व्यभिचारीपणाचा अभ्यारोप करण्याचा धाकदपटशाचा (धमकी) अपराध करील, तर त्याला सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
४) जो कोणी निनावी संदेशाद्वारे, किंवा कोणी धमकी दिलेली आहे त्या व्यक्तीचे नाव, किंवा वास्तव्यस्थळ लपवण्याची खबरदारी घेऊन फौजदारीपात्र धाकदपटशाचा अपराध करील, त्याला त्या अपराधासाठी पोटकलम (१) मध्ये उपबंधित केलेल्या शिक्षेच्या जोडीला दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल.