Bns 2023 कलम ३४५ : स्वामित्व (संपत्ती) चिन्ह :

भारतीय न्याय संहिता २०२३
स्वामित्वविषयक चिन्हे यांविषयी :
कलम ३४५ :
स्वामित्व (संपत्ती) चिन्ह :
कलम : ३४५ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही व्यक्तीची फसगत करण्याचा किंवा तिला क्षती पोचवण्याच्या उद्देशाने खोटे स्वामित्व-चिन्ह वापरणे.
शिक्षा : १ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशा वापरामुळे हानी किंवा नुकसान झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) जंगम मालमत्ता एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मालकीची आहे असे दर्शविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिन्हास स्वामित्व चिन्ह असे म्हणतात.
२) जर कोणी कोणतीही जंगम मालमत्ता किंवा माल अगर ज्याच्या आत जंगम मालमत्ता किंवा माल आहे असा कोणताही खोका, आवेष्टन किंवा अन्य पात्र अशा रीतीने चिन्हांकित केले की, अथवा ज्यावर कोणतेही चिन्ह अंकित आहे असा कोणताही खोका, आवेष्टन किंवा अन्य पात्र अशा रीतीने वापरले की, जेणेकरुन अशी चिन्हांकित मालमत्ता किंवा माल अथवा याप्रमाणे चिन्हांकित अशा कोणत्याही पात्रात असलेली कोणतीही मालमत्ता किंवा माल ज्या व्यक्तीच्या मालकीचा नाही तिच्या मालकीचा तो आहे असा समज निर्माण व्हावा, तर त्याने खोटे स्वामित्व चिन्ह वापरले असे म्हटले जाते.
३) जो कोणी कोणतेही खोटे स्वामित्व चिन्ह वापरील त्याने लुबाडणूक करण्याचा उद्देश नसताना आपण तसे वागलो असे शाबित केले नाही तर, त्याला एक वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply