Bns 2023 कलम ३३६ : बनावटीकरण (कूटरचना) :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३३६ :
बनावटीकरण (कूटरचना) :
कलम : ३३६ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बनावटीकरण
शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३३६ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ठकवणूक करण्यासाठी बनावटीकरण.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३३६ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही व्यक्तीच्या लौकिकाला बाध याचा या उद्देशाने किंवा त्या प्रयोजनार्थ त्याचा वापर होण्याचा संभव आहे हे माहीत असताना बनावटीकरण करणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) जो कोणी जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला नुकसान किंवा क्षती पोचवण्याच्या अगर कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेचा कब्जा सोडून द्यावयास लावण्याचा, अगर कोणतीही स्पष्ट किंवा उपलक्षित संविदा करण्याच्या उद्देशाने अथवा कपट करण्याच्या किंवा ते कपट करणे शक्य व्हावे या उद्देशाने कोणताही खोटा दस्तऐवज किंवा खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख किंवा दस्तऐवजाचा किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा काही भाग बनवतो तो बनावटीकरण करतो.
२) जो कोणी बनावटीकरण करील त्याला, दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
३) बनावट दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख ठकवणूक करण्यासाठी वापरला जावा या उद्देशाने जो कोणी बनावटीकरण करील त्याला, सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
४) जो कोणी बनावटीकरण करील आणि त्या बनावट दस्तऐवजामुळे किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखामुळे कोणत्याही व्यक्तीच्या लौकिकास बाध यावा असा ज्याचा उद्देश असेल, किंवा त्या प्रयोजनासाठी तो वापरला जाणे संभवनीय आहे याची ज्याला जाणीव असेल त्याला, तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply