भारतीय न्याय संहिता २०२३
आगळिकीविषयी (रिष्ठि) :
कलम ३२४ :
आगळीक (रिष्ठि) :
कलम : ३२४ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आगळीक
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ज्या व्यक्तीची हानी किंवा नुकसान झाले असेल ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
——-
कलम : ३२४ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आगळीक , त्यायोगे शासकीय किंवा स्थानीक प्राधिकणाची संपत्ति सहित कोणत्याही संपत्तिची हानी अथवा नुकसान घडवून आणणे.
शिक्षा : १ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
——-
कलम : ३२४ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आगळीक, ज्यायोगे वीस हजार रुपये परंतु २ लाख रुपयांपेक्षा कमी हानी किंवा नुकसान होते.
शिक्षा : २ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ज्या व्यक्तीची हानी किंवा नुकसान झाले असेल ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
——-
कलम : ३२४ (५)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आगळीक, ज्यायोगे एक लाख रुपए किंवा त्यापेक्षा अधिक हानी किंवा नुकसान होते.
शिक्षा : ५ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
कलम : ३२४ (६)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही व्यक्तीची मृत्यू किंवा तिला दुखापत घडवून आणण्याचा किंवा तिला गैरनिरोध करण्याचा, अथवा तिला मृत्यूची, किंवा दुखापतीची,किंवा गैरनिरोधाची भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने तयारी करुन जो कोणी आगळीक करील.
शिक्षा : ५ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला गैरहानी किंवा नुकसान पोचण्याच्या उद्देशाने, किंवा पोचण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना जो कोणी कोणत्याही मालमत्तेचा नाश घडवून आणतो, अथवा ज्यामुळे कोणत्याही मालमत्तेचे मूल्य किंवा उपयुक्तता नष्ट होईल, किंवा कमी होईल, किंवा त्यावर क्षतिकारक परिणाम होईल असा कोणताही बदल त्या मालमत्तेत किंवा तिच्या स्थितिस्थानात घडवतो तो आगळीक करतो.
स्पष्टीकरण १:
आगळिकीचा अपराध घडण्याच्या बाबतीत, अपराध्याने क्षती पोचलेल्या किंवा नष्ट झालेल्या मालमत्तेच्या मालकास हानी किंवा नुकसान पोचवण्याचा अपराध्याचा उद्देश असावयास पाहिजे हे अत्यावश्यक नाही. जर कोणत्याही मालमत्तेला क्षती पोचवून कोणत्याही व्यक्तीला गैरहानी किंवा नुकसान पोचवण्याचा त्याचा उद्देश असला, अथवा पोचण्यास कोणत्याही व्यक्तीला गैरहानी किंवा नुकसान पोचवण्याचा त्याचा उद्देश असला, अथवा पोचण्यास आपण कारण होण्याचा संभव आहे याची त्याला जाणीव असली तरी, तेवढे पुरेसे आहे. मग ती मालमत्ता त्या व्यक्तीच्या मालकीची असो वा नसो.
स्पष्टीकरण २:
आगळिकीची कृती करणाऱ्या व्यक्तीच्या किंवा ती व्यक्ती आणि इतर व्यक्ती यांच्या संयुक्त मालकीच्या मालमत्तेवर परिणाम करणाऱ्या कृतीद्वारे आगळीक करता येईल.
उदाहरणे :
(a) क) (य) ला गैर हानी पोचवण्याच्या उद्देशाने (क) इच्छापूर्वक (य) चा मूल्यवान रोखा जाळतो. (क) ने आगळीक केली आहे.
(b) ख) (य) ला गैर हानी पोचवण्याच्या उद्देशाने (क) हा (य) च्या बर्फगृहात पाणी सोडतो आणि त्यामुळे बर्फ वितळू लागते. (क) ने आगळीक केली आहे.
(c) ग) (क) इच्छापूर्वक (य) ची एक अंगठी नदीमध्ये फेकतो, त्यायोगे (य) ला गैर हानी पोचावी असा त्याचा उद्देश आहे. (क) ने आगळीक केली आहे.
(d) घ) आपणांकडून (य) ला देणे असलेले ऋृण फेडण्यासाठी दरखास्त-कार्यवाहीत आपली जायदाद घेतली जाण्याच्या बेतात आहे याची जाणीव असताना (क) ती जायदाद नष्ट करतो आणि त्यायोगे (य) ला ऋृणाची फेड मिळू नये आणि त्यामुळे (य) चे नुकसान व्हावे असा (क) चा उद्देश आहे. (क) ने आगळीक केली आहे.
(e) ङ) जहाजाचा विमा उतरवलेला असता हमीदारांना नुकसान पोचवण्याच्या उद्देशाने इच्छापूर्वक (क) ते जहाज टाकून देण्याची व्यवस्था करतो. (क) ने आगळीक केली आहे.
(f) च) (क) एक जहाज टाकून देण्याची व्यवस्था करतो, ज्याने त्या जहाजाच्या तारणावर पैसे कर्जाऊ दिले आहेत अशा (य) ला नुकसान पोचावे असा त्यामागे त्याचा उद्देश आहे. (क) ने आगळीक केली आहे.
(g) छ) एका घोड्यावर (य) च्या जोडीला (क) चा संयुक्त मालकीहक्क असून, (क) तो घोडा गोळी घालून मारतो आणि त्यामुळे (य) ला गैर हानी पोचावी असा (क) चा उद्देश आहे. (क) ने आगळीक केली आहे.
(h) ज) (य) च्या पिकाचचे नुकसान करण्याच्या उद्देशाने आणि तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव आहे याची स्वत:ला जाणीव असताना (क) हा (य) या शेतामध्ये गुरेढोरे घुसवतो. (क) ने आगळीक केली आहे.
२) जो कोणी आगळीक करील त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची; किंवा दोन्ही शिक्षा होतील.
३) जो कोणी आगळीक करील आणि त्यायोगे शासकीय किंवा स्थानीक प्राधिकणाची संपत्ति सहित कोणत्याही संपत्तिची हानी अथवा नुकसान घडवून आणील त्याला एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
४) जो कोणी आगळीक करील आणि त्यायोगे वीस हजार रुपयांपैक्षा जास्त परंतु दोन लाख रुपयांपेक्षा कमी रकमेपर्यंत हानी अथवा नुकसान घडवून आणील त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
५) जो कोणी आगळीक करील आणि त्यायोगे एक लाख रूपये किंवा त्याहून अधिक रकमेपर्यंत हानी अथवा नुकसान घडवून आणील त्याला पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
६) कोणत्याही व्यक्तीची मृत्यू किंवा तिला दुखापत घडवून आणण्याचा किंवा तिला गैरनिरोध करण्याचा, अथवा तिला मृत्यूची, किंवा दुखापतीची,किंवा गैरनिरोधाची भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने तयारी करुन जो कोणी आगळीक करील त्याला पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.